जिल्ह्यातील रुग्णालयांवर आजपासून छापासत्र
By admin | Published: March 9, 2017 11:44 PM2017-03-09T23:44:57+5:302017-03-09T23:44:57+5:30
अकरा पथकांची नियुक्ती : जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष ठेवणार
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथे स्त्री भ्रूणहत्येचा कत्तलखाना चालविणाऱ्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या धक्कादायक प्रकारानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तातडीने बैठक घेऊन, जिल्ह्यातील सर्व रूग्णालयांवर अचानक छापे टाकून तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ११ पथके तयार केली आहेत. परवान्यापासून सोनोग्राफी सेंटरच्या सर्व माहितीची तपासणी होणार आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा डॉ. खिद्रापुरे याने अनैसर्गिक गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर म्हैसाळमध्ये डॉ. खिद्रापुरे याने महिलांचे गर्भपात करून पुरलेले सर्व १९ भ्रूण सापडले होते. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. खिद्रापुरे याची कसून चौकशी केल्यानंतर, तो कर्नाटकातील डॉक्टरांकडून गर्भवती महिलांची सोनोग्राफी करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारचा उद्योग सांगली, मिरज शहरातील काही रूग्णालयांत चालत असल्याच्या निनावी तक्रारी येत आहेत.
जिल्ह्यातही डॉ. खिद्रापुरेप्रमाणे काही डॉक्टरांचा प्रताप सुरु आहे का?, रूग्णालयाचे डॉक्टर आणि भेट देणाऱ्या डॉक्टरांची नावे, रूग्णालयाची नोंदणी केली आहे का?, सोनोग्राफी सेंटरमध्ये गैरकारभार चालतो का? यासह अनेक गोष्टींचा तपासणीमध्ये शोध घेतला जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भोसले यांनी वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांचा पथकामध्ये समावेश असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याला एक आणि सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेसाठी एक, अशी ११ पथकांची नियुक्ती केली आहे. अनोंदणीकृत रूग्णालये, नर्सिंग होम, गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्रे यांची धडक मोहिमेद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
या सर्वांची तपासणी करून संबंधित पथकाने दि. २७ मार्च २०१७ पूर्वी सविस्तर अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रूग्णालय यांच्याकडे सादर करायचा आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारीही अनधिकृत स्त्री भ्रूणहत्येच्या प्रकारावर करडी नजर ठेवणार आहेत. प्रत्येक निनावी तक्रारीची गंभीर दखल घेऊन रूग्णालयांची तात्काळ तपासणी होणार असून, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
रुग्णालयातील मूलभूत सुविधांची तपासणी
उपचार केंद्र (परिचारक, रूग्णालय), रूग्णालय इमारतीची रचना, मालमत्ता नोंदणी, रुग्णालय इमारतीचा परवाना, रूग्णालयाचा यापूर्वीचा तपासणी दिनांक (रूग्णालयाच्या प्रकारानुसार), रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व भेट देणारे डॉक्टर आणि रूग्ण पाठविणाऱ्या डॉक्टरांच्या नोंदी, रूग्णालयातील खोल्या योग्य आहेत का?, समुपदेशन खोली आणि प्रतीक्षा खोली आहे का?, वैद्यकीय कचऱ्याची कशापध्दतीने विल्हेवाट लावली जाते, रूग्णालयात अग्निशमन सेवेची तरतूद आहे का?, रूग्णालयाच्या इतर सेवा, प्रसुती खोली, प्रयोगशाळा, सोनोग्राफी सेवा आदी मुद्यांद्वारे रूग्णालयांची पथकाकडून तपासणी होणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.