सराफ समितीमार्फत आज सांगली बंद
By admin | Published: April 4, 2016 12:13 AM2016-04-04T00:13:03+5:302016-04-04T00:17:00+5:30
अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या
सांगली : केंद्र शासनाने सोन्यासह इतर आभूषणांवर लागू केलेला एक टक्का अबकारी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी आज, सोमवारी सांगली व कुपवाड शहरात बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या पाठिंब्यानेच आजचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सराफ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आज बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुवर्णकारांवर लादलेल्या अबकारी करामुळे व्यवसायास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आज बंद पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वजण यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय, मेडिकल, हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. बंदबाबत सांगली सराफ समितीच्यावतीने पत्रकांचे वाटप केले आहे. या आंदोलनामागची भूमिका त्यांनी यातून मांडली आहे. सर्वपक्षीय प्रतिनिधींनी पाठिंबा दिल्याने बंद यशस्वी होईल, असा विश्वास सराफ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापारी महासंघ, सांगली व्यापारी असोसिएशन, व्यापारी एकता असोसिएशन व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)