सांगलीला आजपासून अपुरा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 11:48 PM2016-04-20T23:48:10+5:302016-04-20T23:48:10+5:30
नदी कोरडी : धरणातील पाण्याची प्रतीक्षा
सांगली : कृष्णा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने गुरुवारपासून सांगली व कुपवाड या दोन शहरांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. कोयना धरणातून सोडलेले पाणी बुधवारपर्यंत सांगलीच्या आयर्विन पुलापर्यंत पोहोचलेले नव्हते. त्यामुळे महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी दिली.
सांगली व कुपवाड या दोन शहरांना कृष्णा नदीतून पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या सांगलीजवळील कृष्णा नदीतील पाणी उपसा केंद्राच्या इंटकवेलजवळील पाणीसाठा कमी झाला आहे. कृष्णा नदी कोरडी पडली असून, साठलेल्या पाण्यातूनच शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. कृष्णा नदीत पाणी सोडण्याबाबत महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे वारंवार विनंती केली आहे. आठ दिवसांपूर्वीच महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्र देऊन, कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. पण कोयना धरणातून सोडलेले पाणी आजअखेर सांगलीत पोहोचू शकलेले नाही. त्यामुळे सांगलीच्या पात्रातून बुधवारी रात्री आठपासूनच पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी शहरात अपुरा पाणी पुरवठा होईल.
कोयनेतून सोडलेले पाणी सांगलीत येण्यास दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागत आहेत. त्यातच नदीपात्रातील पाणी वाहते नसल्याने नागरिकांनी ते उकळून प्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. नदीपात्रात पुरेपूर पाणी आल्यानंतर पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल, असेही उपाध्ये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)