शिराळ्यात आजपासून उमेदवारी अर्ज

By admin | Published: October 24, 2016 12:16 AM2016-10-24T00:16:44+5:302016-10-24T00:16:44+5:30

नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार : जिवंत नागपूजेस परवानगीबाबत ठराव

Today's application for candidature from Shiral | शिराळ्यात आजपासून उमेदवारी अर्ज

शिराळ्यात आजपासून उमेदवारी अर्ज

Next

विकास शहा ल्ल शिराळा
शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरूवात होत आहे. मात्र ‘नागपंचमीचे बत्तीस शिराळा’ या गावाने जिवंत नागपूजेस जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रकियेवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सोमवार दि. २४ ते शनिवार दि. २९ या अर्ज भरण्याच्या कालावधित शिराळकरांच्या खऱ्या एकीचे आणि नागपंचमीबाबतचे प्रेम याचे दर्शन घडणार आहे.
गतवर्षी नागपूजेसच बंदी घातल्याने, २००२ पासून चालू असलेल्या विविध आंदोलनास बगल देऊन निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बहिष्काराचा मोठा निर्णय यशस्वी कसा करायचा आणि या नागपूजेला परवानगी कशी मिळवायची, यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी ‘नागपंचमी’ बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीमार्फत नागपंचमी हा विषय वेगाने हाताळण्यास सुरूवात केली. याचे फलित म्हणजे सर्व राजकीय पक्षांनी या बहिष्कारास पाठिंबा दिला. निवडणूक बहिष्कारानंतर पहिलीच निवडणूक शिराळा नगरपंचायतीसाठी होत आहे. त्यामुळे हा बहिष्काराचा लढा तीव्र करण्याचा निर्णय झाला. ‘उमेदवारी अर्ज भरणाऱ्यास गाढवाची सवारी’ असे फलकही झळकले.
समितीने आपण हा बहिष्काराचा निर्णय का घेतला, न्यायालयीन लढ्यासाठी निधी गोळा करणे गरजेचे आहे, हे सांगण्यासाठी नागरिकांची बैठक बोलाविली. यावेळी नागरिकांतून प्रतिसाद तसेच विविध सूचनाही झाल्या. त्यावेळी ‘नागपंचमीचे बत्तीस शिराळा’ असे नामकरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याप्रमाणे नागरिकांनी आपल्या वाहनावर तसेच दुकान फलकांवर नावात बदल करून लिहिण्याचे चालूही केले आहे.
आता सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे चालू होत आहे. एखाद्याने खोडसाळपणा करू नये यासाठी जनजागृतीही करण्यात येत आहे. समितीने गांधीगिरीने नागपूजेसाठी आंदोलन चालू केले आहे. राष्ट्रीय कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे आदी सर्व पक्षांनीही या बहिष्कारास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा बहिष्कार शंभर टक्के यशस्वी होणार, याचा कृती समिती आणि गावकऱ्यांना विश्वास आहे. येथील नागरिकांना कल्पना आहे, नागपंचमी चालू झाली तरच ‘बत्तीस शिराळ्याचे’ नाव राहणार आहे. त्यामुळे शिराळकऱ्यांच्या सर्वधर्मसमभाव, नाग पकडण्याची कला, सर्व मित्र, ऐतिहासिक परंपरा आणि सण यासाठी एकीचे दर्शन घडणार आहे.
एस. डी. भोसले : निवडणुकीत सहभागी व्हा
शिराळा नगरपंचायत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. भोसले म्हणाले, शिराळा येथील पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी प्रशिक्षण वर्गही झाले आहेत. येथील नागरिकांनीही शिराळा शहराच्या विकासासाठी या निवडणुकीत सहभागी व्हावे, अशी प्रशासनाची भूमिका आहे.


 

Web Title: Today's application for candidature from Shiral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.