योग्य करिअर निवडण्याची आज अंतिम संधी
By admin | Published: May 26, 2017 11:12 PM2017-05-26T23:12:43+5:302017-05-26T23:12:43+5:30
योग्य करिअर निवडण्याची आज अंतिम संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहावी-बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, शिक्षणासाठी कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबतचे सर्वोत्तम पर्याय सुचविणाऱ्या आणि सर्वांगीण सल्ला देणाऱ्या ‘लोकमत’ अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१७ ला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थी-पालकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी प्रदर्शनाचा अंतिम दिवस असून, नव्या दिशांची माहिती मिळविण्याची ही शेवटची संधी असणार आहे.
येथील राम मंदिर चौकातील कच्छी जैन भवनात सर्वांसाठी मोफत प्रवेश असणाऱ्या या प्रदर्शनात सांगली शहरासह राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. ‘नो मोअर कन्फ्युजन’ या थीमसह यंदाचे प्रदर्शन भरविण्यात आल्याने करिअरबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील द्विधा मन:स्थिती घालविण्यासाठी प्रदर्शन व तेथे होत असलेली व्याख्याने प्रभावी ठरत आहेत.
करिअरबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने प्रदर्शनाला शहरासह जिल्ह्यातून गर्दी होत आहे.
प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या आवडी-निवडीची विचारणा करून त्यांना संस्थेचे विविध अभ्यासक्रम व त्यांच्या कालावधीसह शुल्काची सविस्तर माहिती दिली जात आहे. काही स्टॉलवर त्यांना चित्रफितीद्वारे अभ्यासक्रमातील विविध संधी व संस्थेच्या परिसराची माहिती दिली जात होती. विद्यार्थी-पालकांना प्रवेशात निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसनही करण्यात येत होते.
प्रदर्शनामध्ये जेईई उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कोल्हापूरचे शैलेश नामदेव यांच्याहस्ते करण्यात आला. शैलेश नामदेव यांनी ‘इंजिनिअरिंग व मेडिकलची तयारी’ या विषयावर विद्यार्थी-पालकांशी संवाद साधला.
दरम्यान, अॅस्पायर २०१७ प्रदर्शनाचे उद्घाटन खा. संजयकाका पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी खा. पाटील म्हणाले की, स्पर्धेच्या युगात करिअर कसे घडवायचे याबाबत विद्यार्थी चाचपडत आहेत, तर पालकही संभ्रमावस्थेत आहेत. अशा परिस्थितीत ‘लोकमत’ने आयोजित केलेले शैक्षणिक प्रदर्शन कौतुकास पात्र आहे. या उपक्रमात ‘लोकमत’ने सातत्य ठेवावे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
पेठ (ता. वाळवा) येथील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश जोशी म्हणाले की, ‘लोकमत’ने एकाच ठिकाणी विविध अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्रदर्शनात २३ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली आहेत, याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा.
डायस अॅकॅडमीच्या सीईओ दिशा पाटील म्हणाल्या की, दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध पर्यायांमधून योग्य पर्याय निवडण्यासाठी अशा प्रदर्शनांची आवश्यकता आहे.
प्रदर्शनाचा समारोप समारंभ शनिवारी असून यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे उपस्थित राहणार आहेत.
लकी ड्रॉचे मानकरी...
पेन ड्राईव्ह विजेते : दत्तात्रय भडीगर, अमोल पालेकर, जैद शेख, अमन महाबरी, विश्वेश शिरोडकर
इमिटेशन ज्वेलरी विजेते : स्वाती जाधव, एस. एस. हाळुंडे, सईदा पिरजादे, नीलिमा व्होरा, रेखा सरनोबत