सांगलीत आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन : मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:37 AM2018-08-07T00:37:26+5:302018-08-07T00:38:01+5:30
राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी
सांगली : राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती देऊन मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही फसवे असल्यानेच मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज, मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
त्यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना, राज्य सरकार जाणून-बुजून आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर टाकत आहे. अनेक तरुणही आत्महत्या करू लागल्याने या आंदोलनाने गंभीर रूप घेतले आहे. समाजातील तरुणांना आमचे सांगणे आहे की, आरक्षण हे आपल्या हक्काचे आहे. त्यासाठी कोणीही आपला जीव देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांवरही अनेक संकटे आली; मात्र त्यांनीही धिराने तोंड देत संकटांचा सामना केला.
मुख्यमंत्र्यांनी रविवारी मेगा भरतीला स्थगिती देत राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मेगा भरती रद्द करावी अथवा स्थगिती द्यावी, अशी कोणतीही मागणी मराठा समाजाने केली नव्हती. तरीही ही स्थगिती देऊन मुख्यमंत्र्यांनी रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळेच येत्या नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याची त्यांची घोषणाही फसवी असल्यानेच आता तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे.
मंगळवारी सांगलीतील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात होईल. सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करावे.
यावेळी डॉ. संजय पाटील, विलास देसाई, प्रवीण पाटील, अॅड. अमित शिंदे, चंद्रकांत डिगे, नानासाहेब कदम, संकेत परब, अनिकेत परब, राहुल पाटील, श्रीरंग पाटील, योगेश पाटील, नाना हलवाई, सौरभ भोसले, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
'
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोणतेही हिंसक आंदोलन करण्यात येणार नाही, असे संयोजकांनी स्पष्ट केले. ठिय्या आंदोलन अहिंसात्मक मार्गाने करण्यात येणार असून, कोणीही सरकारी कार्यालयांची मोडतोड, एसटी बसेसची तोडफोड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.