ऐन उन्हाळ्यात टोमॅटोचे आव्हान पेलले !
By admin | Published: April 5, 2017 11:24 PM2017-04-05T23:24:02+5:302017-04-05T23:24:02+5:30
शेतकऱ्यांसमोर आव्हान : वाढती उष्णता, नैसर्गिक आपत्तीचा करावा लागणार सामना; दलालांवरच शेतकरी अवलंबून
शंकर पोळ ल्ल कोपर्डे हवेली
कमी अवधीत जादा पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी टोमॅटोचे पीक घेतात. सध्या उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या लागणीस प्रारंभ झाला आहे. वाढत्या तापमानामुळे टोमॅटोच्या बागा जगवण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकरी तिन्ही हंगामांत टोमॅटोचे पीक घेतात. दोन्ही हंगामांच्या तुलनेत उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना जादा दर मिळाला आहे; पण पीक चांगले आणण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. रोगाचे प्रमाण आणि नैसर्गिक संकटाचा सामना उन्हाळी हंगामात जास्त असतो. हा हंगाम धोक्याचा ठरत असताना अनेक शेतकऱ्यांना तो फायद्याचाही ठरला आहे. अलीकडच्या काही वर्षांत फायद्यापेक्षा टोमॅटो तोट्याचाच ठरला आहे; पण दर मिळेल या आशेवर अनेक शेतकरी टोमॅटोच्या लागणी करत असतात. अलीकडच्या काही वर्षांत उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अतिरिक्त उत्पादन होत असल्याने टोमॅटोची शेती तोट्यात गेली आहे. तरीही शेतकरी धाडसाने आशेवर उत्पादन घेत असतात. तीन महिन्यांत निघणारे आणि वजनी असलेल्या टोमॅटोच्या पिकाने कुणाला लखपती केले आहे तर कुणाला कर्जात लोटले आहे. त्यामुळे काहींनी टोमॅटोच्या शेतीला फाटा दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करू लागले आहेत. त्यामध्ये मलचिंग पेपरचा वापर, ठिबक सिंचन आदींसह नवनवीन बियाण्यांचा वापर करत आहेत. काही शेतकरी पोट सरीने पिकाला पाणी देत आहेत. अरली तसेच अन्य भरपूर उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या रोपांची व रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणाऱ्या वाणांची शेतकरी लागण करत आहेत. अडीच फूट सरीपासून साडेचार फूट सरीत लागणी सुरू आहेत. सरासरी एकरी एका लाखापर्यंत उत्पादन खर्च येत आहे.गतवर्षी टोमॅटोला सर्वात जास्त दर आॅगस्ट महिन्यात मिळाला होता. दहा किलोचा मुंबई मार्केटचा सहाशे दहा रुपये होता. नंतरच्या काही दिवसांत दर पडल्याने शेतकऱ्यांनी तोडे थांबविले होते. सध्या दहा किलोचा दर दीडशे ते दोनशे रुपये आहे. तरी हा दर उत्पादन खर्चाचा विचार केल्यास परवडत नाही.
अडीचशे रुपये दर मिळाल्यास टोमॅटोची शेती काही प्रमाणात परवडते. उन्हाळी हंगामातील टोमॅटोचे पीक आणणे शेतकऱ्यांपुढे आव्हान असते. सध्या टोमॅटोच्या लागणीस गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे.
नैसर्गिक आपत्ती; रोगाचाही प्रादुर्भाव
उन्हाळी हंगामात टोमॅटो पिकावर करपा, आकसा, काळा ठिपका, पान आळी आदी रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यातून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार औषध फवारणी करावी लागते. तसेच गारपीट, वादळी वाऱ्यासह पाऊस व वाढत्या उष्णतेपासूनही पिकाचे संरक्षण करावे लागते.
टोमॅटोचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काळानुसार बदल स्वीकारले आहेत. तोडा केल्यानंतर टोमॅटो साठविण्यासाठी पूर्वी लाकडी पेट्या, करंडे, कागदी बॉक्सचा वापर केला जायचा. त्यातूनच टोमॅटो विक्रीसाठी पाठवले जायचे. मात्र, सध्या कॅरेटचा वापर केला जात आहे. चार ते पाच रुपये दराने शेतकरी भाडेतत्त्वावर कॅरेट घेत आहेत.
टोमॅटोला मुंबईसह कोल्हापूर, पुणे, अहमदाबाद, बेळगाव, कऱ्हाड, चिपळूण, पणवेल येथे बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र, विभागातील बहुतांश शेतकरी सध्या मुंबई बाजारपेठेतच टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात. टोमॅटोचा दर दलालांवर अवलंबून असतो. दलालांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. तसेच जादा उत्पादन झाले तर त्याचा परिणाम दरावर होत असतो.