दहा व्हेंटिलेटर घेतले, पण आम्हांला नाही विचारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:24+5:302021-05-26T04:28:24+5:30
सांगली : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने दहा व्हेंटिलेटर खरेदी केले. प्रशासनाने हे व्हेंटिलेटर भाडेतत्त्वावर खासगी रुग्णालयात दिले. पण या ...
सांगली : कोरोना रुग्णांसाठी महापालिकेने दहा व्हेंटिलेटर खरेदी केले. प्रशासनाने हे व्हेंटिलेटर भाडेतत्त्वावर खासगी रुग्णालयात दिले. पण या साऱ्या घडामोडीबाबत स्थायी समितीचे सदस्य मात्र अनभिज्ञ होते. मंगळवारी सभेत सदस्यांनी व्हेंटिलेटर परस्परच भाड्याने का दिले, आम्हांला का विचारले नाही, असा संताप व्यक्त करीत आरोग्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकाराचा खुलासा होईपर्यंत स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली.
सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी स्थायीची सभा झाली. गत सभेत स्थायी समितीने दहा व्हेंटिलेटर खरेदीला मान्यता दिली होती. इतिवृत्त मंजुरीवेळी हा विषय निघताच सदस्यांनी हे व्हेंटीलेटर कुठे आहेत? असा प्रश्न अधिकाऱ्यांना केला. त्यावर जिल्हा प्रशासनाने शिफारस केलेल्या खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर भाड्याने दिल्याचे सांगण्यात आले. यावर गजानन मगदूम, मंगेश चव्हाण, सविता मदने, संजय यमगर, प्रकाश मुळके आदींनी प्रशासनाला धारेवर धरले.
नगरसेवक मगदूम यांनी व्हेंटिलेटर खरेदीच्या नावावर लुटालुटीचा धंदा सुरू असल्याचा आरोप केला. सविता मदने यांनी महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने सामान्य कोरोना रुग्णाला याचा लाभ व्हावा, यासाठी व्हेंटिलेटर खरेदीला स्थायीने मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात खरेदी केलेली व्हेंटिलेटर आहेत कुठे? खासगी रुग्णालयाला देताना स्थायीला विचारले होते काय? खासगी दवाखान्यात व्हेंटिलेटरची मागणी नसतानाही प्रशासनाने सदस्यांना विश्वासात न घेता व्हेंटिलेटर दिलेच कसे? असा सवाल उपस्थित केला.
खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये एमडी डॉक्टर सेवेत असणाऱ्या कोविड रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. प्रत्यक्षात बीएचएमएस डॉक्टर असणार्या दवाखान्यात हे व्हेंटिलेटर देण्यात आलेले आहेत. ही खासगी रुग्णालये रुग्णांकडून हजारो रुपये लुटत आहेत, असा आरोपही सभेत करण्यात आला.
चौकट
गुरुवारी तहकूब सभा
आरोग्याधिकाऱ्यांकडून खुलासा होईपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी सदस्यांनी केली. आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोेळे सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे गुरवारपर्यंत स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आल्याचे सभापती कोरे यांनी सांगितले.
चौकट
महापौर, सभापती अनभिज्ञ
स्थायीने ५५ लाख रुपये किंमतीचे दहा व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेतला होता. मंजुरी मिळताच प्रशासनाने त्याची खरेदी करून शहरातील बड्या रुग्णालयांना भाड्याने दिले. याबाबत स्थायी सदस्यांसह महापौर दिग्विजय सूर्यवंशी व सभापती कोरे हेही अनभिज्ञ होते.