देवाचीही फसवणूक!, फाटलेल्या नोटा अर्पण करून फेडला नवस, सांगलीतील अजब प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:21 PM2023-01-11T16:21:54+5:302023-01-11T16:23:04+5:30

सांगली : जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये नवसापोटी भाविकांनी लहान-मोठ्या वस्तू तसेच दानपेटीत नाणी-नोटा अर्पण केल्या होत्या. मंदिर व्यवस्थापनाने दानपेटी उघडल्यानंतर ...

Torn notes in donation boxes in temples in Sangli district | देवाचीही फसवणूक!, फाटलेल्या नोटा अर्पण करून फेडला नवस, सांगलीतील अजब प्रकार

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये नवसापोटी भाविकांनी लहान-मोठ्या वस्तू तसेच दानपेटीत नाणी-नोटा अर्पण केल्या होत्या. मंदिर व्यवस्थापनाने दानपेटी उघडल्यानंतर फाटलेल्या, मळकटलेल्या नोटांचा खच दिसून आला. अनेक नोटा टाकून देण्याची वेळ व्यवस्थापनांवर आली.

जिल्ह्यातील काही मंदिरांत नकली चांदीच्या वस्तू कमी-अधिक प्रमाणात जमा झाल्या आहेत. म्हणजे नवस फेडण्यासाठी देवाचीही फसवणूक केली जात आहे, असेच उद्गार मंदिर विश्वस्तांच्या तोंडून निघाले. मंदिराचे व्यवस्थापन सोडून अनेकदा येथील कर्मचाऱ्यांना किंवा पुजाऱ्यांना बँकांच्या रांगेत नोटा बदलण्यासाठी थांबावे लागते. वारंवार हा त्रास होत असल्यामुळे बऱ्याचदा या नोटा फेकून दिल्या जातात.

चांदी नव्हे व्हाईट मेटल

भाविकांनी लहान-मोठ्या चांदीच्या वस्तू दान म्हणून मंदिरात दिल्या. त्या ज्वेलर्सकडे नेल्या असता त्यातील १५० ते २०० ग्रॅमच शुद्ध चांदी निघाली. बाकीचे व्हाइट मेटल होते. अशा सर्व वस्तूंची नोंद धर्मादाय सहआयुक्तालयात करावी लागते. त्यासाठी ज्वेलर्सकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते.

न चालणाऱ्या नोटा दानपेटीत टाकतात...

अनेक जण बाजारात फाटक्या नोटा चालवून पाहतात. त्या कोणी स्वीकारल्या नाहीत, तर शेवटी देवाला दान म्हणून त्या पेटीत टाकतात. बँकांमधून त्या बदलून घेण्याची तसदी घेतली जात नाही. या पद्धतीमुळे दिवसेंदिवस दानपेटीतील अशा नोटांची समस्या वाढत आहे.

कशी ओळखली जाते असली चांदी?

ज्वेलर्सकडे चांदी पारखण्याची एक पद्धत आहे. काळ्या रंगाचा छोटा गुळगुळीत दगड त्यांच्याकडे असतो. त्यास कसोटी म्हणतात. या दगडावर चांदीची वस्तू घासली जाते. त्यावर एक थेंब ॲसिड टाकले जाते. एक थेंब मिठाचे पाणी टाकले जाते. चांदीचा रंग त्या थेंबात तरंगतो. त्यावरून ती चांदी किती टक्के शुद्ध आहे हे कळते. आता लेझर मशीन आल्या आहेत. त्यावर काही सेकंदात चांदीची किती शुद्धता व किती अन्य धातू, याचे अचूक वर्गीकरण होते.

फाटक्या नोटांचे पुढे काय होते?

फाटक्या नोटा, चिकटवलेल्या नोटा किंवा जीर्ण नोटांचा मंदिर व्यवस्थापनाला काहीही उपयोग होत नाही. अनेक मंदिरांमध्ये या नोटांची विल्हेवाट लावली जाते.

Web Title: Torn notes in donation boxes in temples in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली