सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; एक ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:36 PM2024-05-17T15:36:14+5:302024-05-17T15:36:21+5:30
आटपाडीत घरांची पडझड : मिरज तालुक्यात केळीच्या बागांसह अन्य पिकांचे नुकसान
सांगली : वादळी वाऱ्यासह आलेल्या वळवाच्या पावसाने गुरुवारी जिल्ह्याला झोडपले. विभूतवाडी (ता.आटपाडी) येथे घरावर झाड कोसळून एक ठार तर दोघेजण जखमी झाले. मिरज तालुक्यात केळी व आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले.
सांगली जिल्ह्यात सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव नागरिकांनी घेतला. सायंकाळी पाच वाजता सांगली, मिरज शहरासह शिराळा, वाळवा, जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात पावसास सुरुवात झाली. तासभर पडलेल्या पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान केले तर दुष्काळी भागात पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना दिलासा मिळाला. आटपाडी, तासगाव, मिरज व शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला.
सांगली, मिरजेत दोन तास हजेरी
सांगली व मिरज शहरातही मध्यम स्वरूपाच्या पावसाने दोन तास हजेरी लावली. प्रमुख रस्ते व गुंठेवारी भागात पाणी साचून राहिले. वादळी वाऱ्याने सांगली ते मिरज रस्त्यावर तसेच माधवनगर रस्त्यावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.
तुंगला केळीची बाग उद्ध्वस्त
तुंग (ता. मिरज) येथे वादळी वाऱ्यामुळे एक एकरातील केळीची बाग कोसळून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आटपाडीत घरांची पडझड
आटपाडी तालुक्यातील हिवतड, गोमेवाडी गावातील अनेक घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पत्र्यांचे छत उडून गेले असून, काही घरांची पडझड झाली. झाड अंगावर पडल्याने आटपाडीत एका बैलाचे शिंग मोडले आहे.
कडेगावला हुलकावणी, खानापुरात तुरळक
कडेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली नाही. खानापूर तालुक्यात पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली.
शिराळा तालुक्यात वादळी वाऱ्याने विजेचे खांब पडले
शिराळा : शिराळा तालुक्यात वादळी वारे व पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विजेचे २० खांब पडून तारा तुटून ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काळोखेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे १० खांब पडले. तारा तुटलेल्या आहेत. भाटशिरगाव, चिखली, मांगले, आरळा, येथे विचेचे खांब व तारा तुटल्या आहे. यामुळे घरातील व शेतातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे.
दिघंचीत दमदार पावसाची हजेरी
दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे गुरूवारी पाच वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. दिघंचीसह संपूर्ण परिसरात दमदार पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, तर मान्सूनपूर्व पावसामुळे करपू लागलेला पिकांना दिलासा मिळाला तर काही ठिकाणी उभी पिके भुईसपाट झाली आहेत.