सांगली, पलूस, कडेगावला वळवाच्या पावसाची हजेरी, पत्राचे शेड कोसळून ११ जखमी
By अविनाश कोळी | Published: May 7, 2023 08:25 PM2023-05-07T20:25:15+5:302023-05-07T20:25:26+5:30
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी ८ मे रोजी सायंकाळी पुन्हा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
सांगली : ढगांच्या गडगडटासह सांगली, पलूस, कडेगाव परिसरात रविवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. कडेगाव येथे वादळी वाऱ्यात पत्राचे शेड कोसळून कर्नाटकातून आलेले ११ शेतमजूर जखमी झाले. सुमारे पाऊण तास पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी ८ मे रोजी सायंकाळी पुन्हा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
सांगली शहरात रविवारी दुपारी सव्वा चार वाजता पावसास सुरुवात झाली. पाच वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. शहरातील सखल भागात पाणी साचून राहिले. वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. मिरज शहरातही पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. सांगलीच्या पश्चिमेला कसबेडिग्रजपर्यंत पाऊस होता. या ठिकाणच्या शेतात पाणी साचले होते. त्यामुळे शेतीच्या नुकसानीची चिंताही आता सतावू लागली आहे.
सांगलीत सकाळपासून उन्हाची तीव्रता अधिक होती. आकाशही निरभ्र होते. सायंकाळी अचानक ढगांच्या दाटीसह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे तापमानात काहीअंशी घट झाली असून, ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी सायंकाळीही पावसाची शक्यता आहे. येत्या ९ मे पासून आकाश निरभ्र होईल, असा अंदाज आहे.