कासचा साठा पाच फुटांवर
By admin | Published: June 12, 2017 11:36 PM2017-06-12T23:36:22+5:302017-06-12T23:36:22+5:30
कासचा साठा पाच फुटांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. अजुनही मान्सून दाखल होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पाणीटंचाईची समस्या गडद होऊ लागली आहे. सद्य स्थितीला तलावात केवळ पाच फुट दहा इंच इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात साडेचार ते पाच फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहिल्यास इंजिनद्वारे पाणी उपसून पाटात सोडावे लागणार
आहे.
कास तलावात किनाऱ्यालगत २५ फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. २०१५ साली २३ जूनला तर गतवर्षी ३ जुलैला तलाव पूर्र्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. परंतु यंदा मान्सून दाखल होण्याचे संकेत अजुनही दिसत नसल्याने आजमितीला तलावातील पाणी पातळी पाच फुटांवर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एका फुटाने पाणीसाठा कमी आहे.
सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दिवसाला एक इंच पाणीपातळी कमी होत आहे. हा पाणीसाठा पाऊस सुरू होईपर्यंत टिकुन राहावा यासाठी तलावातून मुरून वाया जाणारे पाणी रात्रंदिवस दोन इंजिनच्या साह्याने उपसा करून पाटात सोडले जात आहे. एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ््या तलावातील दुसरा हॉल्व्ह मागील महिन्यात पूर्णपणे उघडा पडला आहे. सध्या अंतिम व तिसऱ्या व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे तलावाची पाणीपातळी एक इंचाने वाढली होती. सध्या तलावात पाच फुट दहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.
- जयराम किर्दत, पाटकरी