चांदोलीतील पर्यटनास चालना मिळावी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:59+5:302020-12-07T04:19:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : चांदोलीत पर्यटनाची वाढती संख्या लक्षात घेता, पर्यटन विकासाला चालना मिळणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोलीत पर्यटनाची वाढती संख्या लक्षात घेता, पर्यटन विकासाला चालना मिळणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले पर्यटन एक नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाल्याने महिनाभरात तब्बल दहा हजार पर्यटकांनी चांदोली धरण व अभयारण्य परिसरास भेट दिलेली आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हा सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात चांदोली अभयारण्याचा विस्तार आहे. चांदोली परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. पर्यटनाचे आकर्षणाचे केंद्र बनलेल्या या चांदोली परिसरात पर्यटन विकासाबाबत आराखडा तयार करून शासनाला सादर करण्याचे आदेश अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी दिले होते. मात्र पर्यटन विकासाबाबत काही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे इथल्या व्यवसायाला किंवा पर्यटनाला चालना मिळाली नाही.
चांदोली धरणावर नि:शुल्क परवाना दिला जातो; तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नाममात्र शुल्क आकारून प्रवेश करावा लागतो. या दोन्ही पर्यटनस्थळांसह परिसरातील निसर्गसाैंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
चांदोलीतील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एक नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरअखेर तब्बल दहा हजार पर्यटकांनी या परिसराला भेट दिलेली आहे. त्यापैकी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दीड हजार पर्यटकांनी परवाना घेऊन जंगल सफारी केली. सुमारे साडेतीन हजार पर्यटकांनी मोफत परवाना घेऊन चांदोली धरण पाहण्याचा आनंद घेतला आहे.
चाैकट
पाट्र्यांना आळा घाला
आठवड्याच्या इतर दिवसांच्या तुलनेत शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी चांदोलीत पर्यटकांची तोबा गर्दी होत असते. धरणाच्या पायथ्याला पर्यटकांच्या पाट्र्या होतात; पण अशा घटनांना शाहुवाडी पोलिसांनी थोड्याफार प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून गैरप्रकार वाढण्यापूर्वी त्यांना आळा घालणे गरजेचे आहे.
फोटो-06warnawati01