पर्यटन दिन विशेष: सांगली जिल्ह्यात पर्यटनाचा बोऱ्या, नागरिकांच्या देश-विदेश वाऱ्या
By अविनाश कोळी | Published: September 27, 2023 04:44 PM2023-09-27T16:44:05+5:302023-09-27T16:51:00+5:30
सह्याद्री पर्वतरांगेचा झालेला स्पर्श, जैवविविधतेने समृद्ध असलेले जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला
अविनाश कोळी
सांगली : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबाबत नाके मुरडून स्थानिक नागरिक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर देश-विदेशात फिरायला जात आहेत. कोरोनानंतर पर्यटनाला पसंती देणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यात बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या अत्यंत तुरळक आहे. जिल्ह्यात प्रत्येकवर्षी एका पर्यटनस्थळावर सरासरी केवळ ५ हजार ७४० रुपये खर्च होत आहेत.
सह्याद्री पर्वतरांगेचा झालेला स्पर्श, जैवविविधतेने समृद्ध असलेले जंगल, हिरवाईने नटलेले डोंगर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, नद्यांची संगमस्थळे या माध्यमातून निसर्गाने मुक्तपणे दिलेले दान तसेच साहित्यिक, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा जिल्ह्याला लाभला आहे. तरीही पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याकडे ना राजकीय नेत्यांचे लक्ष आहे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर एकूण २ कोटी ८४ लाख रुपये खर्च झाले. प्रती पर्यटनस्थळ हा खर्च केवळ ५ हजार ७४० रुपये आहे.
तालुकानिहाय पर्यटनस्थळे
शिराळा ८
वाळवा ५
पलूस ४
कडेगाव ४
खानापूर ४
आटपाडी २
तासगाव ४
मिरज १०
क. महांकाळ ४
जत ५
एकूण - ५०
केवळ ‘क’ दर्जाची पर्यटनस्थळे
राष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळांचा अ वर्गात, राज्य स्तरावरील स्थळांचा ब वर्गात, जिल्हा स्तरावरील स्थळांचा क वर्गात तर स्थानिक स्तरावरील पर्यटनस्थळांचा ड वर्गात समावेश होतो. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पर्यटनस्थळे क वर्गात मोडतात.
दरवर्षी ४५०० लोक जातात देश, विदेशात
जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे ४ हजार ५०० लोक देशांतर्गत व परदेशातील पर्यटनास जातात. यातही परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असल्याचे ट्रॅव्हल्स् कंपनीचालकांनी सांगितले.
जिल्ह्यात पाहण्यासारखे काय
चांदोली अभयारण्य, दंडोबा, सागरेश्वर अभयारण्य आदी महत्त्वाची पर्यटनस्थळे असली तरी त्यांच्या विकासाबाबत उदासीनता दिसून येते. जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही चारही पर्यटनस्थळांचा उल्लेख आहे.
निसर्गाने जिल्ह्याला खूप काही दिले, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास झाला नाही. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन विकास होतो, मग सांगलीबाबत उदासिनता का? - प्रदीप सुतार, पर्यटनप्रेमी
कोरोनानंतर पर्यटनास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. देशांतर्गत पर्यटनस्थळांना भेटी देतानाच परदेशात व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया याठिकाणी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. - मंगेश शहा, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स् व्यावसायिक