Sangli: कांडवणच्या पर्यटनातून घडतेय जैवविविधतेचे दर्शन, पर्यटकांचा ओघ वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 06:24 PM2024-01-20T18:24:51+5:302024-01-20T18:26:34+5:30

निसर्ग निरीक्षणाबरोबरच जलपर्यटनाचा आनंद

Tourism of Kandwan in Shahuwadi taluka near Chandoli Dam is a glimpse of biodiversity, Tourists increased | Sangli: कांडवणच्या पर्यटनातून घडतेय जैवविविधतेचे दर्शन, पर्यटकांचा ओघ वाढला

Sangli: कांडवणच्या पर्यटनातून घडतेय जैवविविधतेचे दर्शन, पर्यटकांचा ओघ वाढला

सहदेव खोत

पुनवत : नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या चांदोली धरणाच्या परिसरातील कांडवण जलाशयाकडे पर्यटनाच्या दृष्टीने लोकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गाचे निरीक्षण करीत जलपर्यटनाचा मनमुराद आनंद घेताना हे पर्यटक पाहावयास मिळत आहेत.

चांदोली धरणाजवळ शाहूवाडी तालुक्यातील कांडवण परिसर हा सह्याद्रीच्या डोंगररांगात येतो. डोंगरदऱ्या, घनदाट झाडी, कानसा नदीचे खोरे, विविध प्राण्या-पक्ष्यांचा वावर व नैसर्गिक भूरूपांनी समृद्ध असा हा भाग. परिसर दुर्गम असला तरी, कानसा नदीच्या पाण्यामुळे सुजलाम्-सुफलाम्. पावसाळ्यात तर धो-धो कोसळणारा पाऊस व डोंगरकपारीतून वाहणारे धबधबे सगळ्यांनाच खुणावतात.

चांदोलीपासून जवळच असणारा हा परिसर संपर्काच्या बाबतीत तसा ‘नॉट रिचेबल' म्हणावा लागेल. त्यामुळे कांडवण, मालगाव, कोकणेवाडी, थावडे, विरळे, जांभूर परिसरात जाणाऱ्या कोणाही पर्यटकाला तेवढाच एकांत व निवांतपणा मिळतो. शिराळा तालुक्यातील कोकरूड, खुजगाव, चरण व आरळा येथून कांडवणला जाणारे मार्ग आहेत. त्यामुळे चांदोलीला येणाऱ्या पर्यटकांची पावले तिकडेही वळत आहेत.

धरण परिसरात विपुल वनसंपदा आहे. पर्यटकांना रानमेवाही मिळतो. येथे जंगल सफर व जलसफरही करता येते. जल पर्यटनासाठी येथे बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. या बोटींमधून सुमारे दोन किलोमीटरपर्यंतचा कानसा जलाशयाचा नयनरम्य परिसर पाहता येतो. या प्रवासात विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, मत्स्यबीजनिर्मिती केंद्र, विविध झाडे, जंगल व अधूनमधून गव्यासारख्या वन्यप्राण्यांचेही दर्शन होते.

पर्यटकांनी हे भान ठेवावे

पर्यटकांनी येथे वावरताना हुल्लडबाजी, मद्यपान करणे, दंगा, जल्लोष, परिसराचे विद्रुपीकरण, प्रदूषण अशा गोष्टी टाळून तेथील जैवविविधतेला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्याची गरज आहे. संबंधित प्रशासनानेही इकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत असून, स्थानिक लोकांना यानिमित्ताने व्यवसाय करण्याची संधीही मिळत आहे.

Web Title: Tourism of Kandwan in Shahuwadi taluka near Chandoli Dam is a glimpse of biodiversity, Tourists increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.