Sangli: चांदोली अभयारण्य, कांडवनमध्ये पर्यटकांची गर्दी; वनसंपदा, डोंगरदऱ्या पाहण्याबरोबरच बोटिंगचा लुटतायत आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:14 IST2025-01-14T13:08:25+5:302025-01-14T13:14:21+5:30
हुल्लडबाजीला आळा हवा

Sangli: चांदोली अभयारण्य, कांडवनमध्ये पर्यटकांची गर्दी; वनसंपदा, डोंगरदऱ्या पाहण्याबरोबरच बोटिंगचा लुटतायत आनंद
सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण, अभयारण्य तसेच लगतचे कांडवण धरण आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असून, वनसंपदा, डोंगरदऱ्या पाहण्याबरोबरच जलपर्यटनास प्राधान्य दिले जात आहे.
कांडवण येथे विविध शाळकरी विद्यार्थीही भेट देत असून, येथे वनभोजन कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. सध्या सुरू असलेला हिवाळा ऋतू आणि थंड वातावरण यामुळे सर्वच ठिकाणी पर्यटनस्थळे गजबजली आहेत. याला शिराळा तालुक्यातील चांदोली धरण, अभयारण्य तसेच कांडवण धरणसुद्धा अपवाद नाही. या ठिकाणी सध्या दूरवरून पर्यटकांची गर्दी होत आहे.
शिराळा तालुक्याचे वैभव असलेले चांदोली धरण, वसंत सागर जलाशय तसेच नदीपात्र पाहण्यासाठी पर्यटक प्राधान्य देत आहेत, शिवाय असंख्य पर्यटक अभयारण्य पाहण्याचाही मनमुराद आनंद लुटत आहेत. कांडवण जलाशयात बोटिंगची सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटकांना ही आनंदाची पर्वणी ठरत आहे. अनेक शाळकरी विद्यार्थी वनभोजनासाठी कांडवण तसेच चांदोली परिसरात येत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात जेवण बनवून त्याचा आस्वाद घेत आनंद लुटला जात आहे.
हुल्लडबाजीला आळा हवा
चांदोली परिसरात येणाऱ्या पर्यटकांमधून अनेक पर्यटक येथील पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचे काम करतात. मद्यपान करून हुल्लडबाजी करणे, परिसरात केरकचरा करणे असे अनेक प्रकार येथे घडत असतात.या प्रकाराला पोलिसांनी आळा घातला पाहिजे तसेच स्थानिकांनीही याबाबत दक्षता घेतली पाहिजे. अनेक पर्यटक येथे मुक्कामी राहून आपल्या सहलीचा आनंद द्विगुणित करत आहेत. शिराळा, शाहूवाडी तालुक्यातील अनेक बचत गट, महिला मंडळे, सरकारी नोकरदार यांच्या सहलीही या पर्यटनस्थळांवर जात आहेत.