Sangli: चांदोली धरणाच्या सांडव्याच्या भिंतीजवळ पर्यटकांचा धिंगाणा, सुरक्षा यंत्रणा कुचकामी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:24 PM2024-05-28T12:24:45+5:302024-05-28T12:26:12+5:30
धरणाच्या मुख्य गेटजवळ पर्यटक पोहोचतातच कसे?
वारणावती : पंधरा दिवसांपूर्वी चांदाेली धरणाच्या सांडव्याजवळील डोहात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी चांदोली परिसरात पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाज पर्यटकांनी थेट धरणाच्या मुख्य भिंतीपर्यंत धाव घेतली. आठ ते दहा तरुण धरणाच्या सांडव्याखालील डेड स्टोरेज गेटच्या पाण्यात डुबक्या घेताना दिसून आले. धरणाच्या मुख्य गेटजवळ पर्यटक पोहोचतातच कसे? धरण प्रशासनाची सुरक्षा काय करते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सध्या उन्हाळी सुटी असल्याने चांदोलीला पर्यटकानी पुन्हा गर्दी हाेत होती. त्यातच दोन दिवस सलग सुटी आल्यामुळे पर्यटकांची गर्दी जास्तच हाेती. मात्र चांदोलीच्या पर्यटनाला गालबोट लागण्याचे प्रकार हुल्लडबाज पर्यटकांमुळे वारंवार होत आहेत.
काही हुल्लडबाज पर्यटक मद्यप्राशन करून धरणाच्या नियमावलीचा भंग करतात. मागील काही दिवसात या परिसरात आठ पर्यटकांचा मृत्यू हाेऊनही धरणाची सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. काही हुल्लडबाज पर्यटक धरणाच्या सांडव्याच्या कडेला धरण्याच्या सांडव्यातून गळती होत असलेल्या पाण्यात जाऊन डुबक्या घेताना दिसतात. गतवर्षी चांदोली धरणाची अतिरेकी संघटनेने रेकी केल्याचे समाेर आले हाेते. तरीदेखील प्रशासनाला जाग आलेली नाही.
वॉटर स्पीड ब्रेकर टँकपासून पाठीमागे अंदाजे शंभर तेे दीडशे मीटर लांब तसेच दोन्ही बाजूने अंदाजे दहा मीटर उंच असणारी भिंत ओलांडून धरणाच्या मुख्य भिंतीजवळ जाणे सहजासहजी शक्य नाही. तरीही पर्यटक असे जीवघेणे धाडस करीत असल्याने धरण प्रशासनाची डाेकेदुखी वाढली आहे.
चौकीत रक्षक नाही
मागील एक वर्षापासून धरणाच्या पायथ्याला दक्षिण बाजूस सुरक्षारक्षकांची चौकी बांधण्यात आली आहे. तिचा वापर येथे येणाऱ्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठीच हाेऊ शकताे. शासनाने लाखो रुपयांचा निधी या चौकीसाठी खर्च केला आहे. परंतु अद्याप या चौकीत सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही.