नदीकाठी वीजवाहिन्यांसाठी मनोरे उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 03:54 PM2019-11-29T15:54:05+5:302019-11-29T15:55:00+5:30
तेव्हा नदीकाठचे विजेचे खांब पूर्णत: पाण्याखाली होते. किंबहुना खांबांवरून तीन ते पाच फूट पाणी वाहत होते. यामुळे त्यातून वीजप्रवाह बंद करावा लागला. त्यामुळे शहरातील विविध उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकला नाही.
संतोष भिसे ।
सांगली : सांगलीत कृष्णेकाठी वीजवाहिन्यांसाठी मनोरे उभारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध असून, लवकरच कामाला सुरुवात होईल. महापूर काळात शहराला खंडीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागले होते. तसे संकट पुन्हा येऊ नये यासाठी महावितरणने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या महापूरकाळात निम्म्या सांगली शहराचा वीजपुरवठा अनेक दिवस विस्कळीत झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी जिवाची बाजी लावून कामे केली व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कृष्णेची पाणीपातळी ५५ फुटांवर गेली, तेव्हा नदीकाठचे विजेचे खांब पूर्णत: पाण्याखाली होते. किंबहुना खांबांवरून तीन ते पाच फूट पाणी वाहत होते. यामुळे त्यातून वीजप्रवाह बंद करावा लागला. त्यामुळे शहरातील विविध उपकेंद्रांना वीजपुरवठा होऊ शकला नाही.
भविष्यात असे संकट पुन्हा उद्भवू नये यासाठी नदीकाठी खांबांऐवजी मनोरे उभारण्याचा निर्णय महावितरणने घेतला. त्याच्या कामास लवकरच सुरुवात होणार असून या कामामुळे भविष्यात निर्माण होणा-या अडचणींवर मात करता येणार आहे. हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.