Sangli: येडेनिपाणी येथे विसर्जन सोहळ्यात ट्रॅक्टरला भरधाव ट्रकची धडक; एकजण जागीच ठार, ११ कार्यकर्ते जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 12:40 PM2024-09-18T12:40:29+5:302024-09-18T12:41:13+5:30
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर गणेश मंडळाचा गणपती विसर्जनासाठी नेत असताना ट्रॅक्टरला अपघात झाला. यामध्ये मंडळाचा कार्यकर्ता ...
कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर गणेश मंडळाचा गणपती विसर्जनासाठी नेत असताना ट्रॅक्टरला अपघात झाला. यामध्ये मंडळाचा कार्यकर्ता अल्ताफ सिकंदर मुल्ला (वय ४०) जागीच ठार झाला. अन्य ११ कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास येलूर तलाव रस्त्यावर ही दुर्घटना घडली. मंडळाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा रविवारी नवव्या दिवशी जल्लोषात साजरा झाला. त्यानंतर रात्री कार्यकर्ते ट्रॅक्टर ट्रॉलीतून गणेशमूर्ती घेऊन विसर्जनासाठी येलूर तलावाकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर इटकरे फाट्यावरून पुढे जाताच कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने (एमएच १२, एनएक्स ७३३२) ट्रॉलीस मागून जोराची धडक दिली. त्यामुळे
ट्रॉलीपासून ट्रॅक्टर (क्र. ९२५) वेगळा होऊन सेवारस्त्यावर पडला. सुमारे ७० फुटापर्यंत फेकला गेला. ट्रकने ट्रॅक्टरला धडक देताच चालक अल्ताफ मुल्ला स्टेअरिंगवरून रस्त्यावर पडले. त्याचवेळी ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रॅक्टरची मोठी हानी झाली.
जखमी कार्यकर्ते असे : अमोल बाळासाहेब पाटील (वय ३५), शंकर विलास पाटील (वय ४८), विनायक बाळासाहेब पाटील (वय २१), संदीप सुभाष पाटील (वय ३४), ऋषिकेश बजरंग पाटील (वय ३२), रोहन बाळासाहेब पाटील (वय ३१), शिवराज दत्तात्रय पाटील (वय २५), शंकर निवृत्ती तेवरे (वय २६), संकेत सुनील जोशी (वय १९) महेश बाबासाहेब पाटील (वय ३५), मनोज शिवाजी पाटील (वय ३८) सर्व रा. येडेनिपाणी. जखमींवर उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या घटनेची येडेनिपाणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुरळप पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.
अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला
अपघाताचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, कर्मचारी राहुल पाटील, विक्रम साळुंखे, यशवंत गावडे व सहकाऱ्यांनी मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. या दुर्घटनेने येडेनिपाणी गावावर ऐन गणेशोत्सवात दु:खाची छाया पसरली आहे.