वडिलांची सेवा करुन निघाली अन् ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडली, सांगलीतील येवलेवाडीजवळ महिला जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:46 PM2023-02-09T12:46:28+5:302023-02-09T12:46:54+5:30
सुजाता देसाई यांच्या अपघाती मृत्यूमुळे नवे तांबवे व शिराळा येथे शोककळा पसरली.
रेठरे धरण : येवलेवाडी (ता. वाळवा) येथे ट्रॅक्टर - ट्रॉलीची दुचाकीस धडक बसल्यानंतर ट्रॉलीखाली सापडून पतीसाेबत माहेरहून सासरी निघालेली महिला जागीच ठार झाली. सुजाता विष्णू देसाई (वय ४०, रा. शिराळा) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात घडला.
सुजाता देसाई यांचे सासर शिराळा असून, माहेर नवे तांबवे आहे. वडील आनंदा यशवंत धुमाळ हे आजारी असल्याने त्यांची सेवा करण्यासाठी त्या गेला आठवडाभर नवे तांबवे येथे माहेरी राहिल्या होत्या. मंगळवारी रात्री आठ वाजता त्यांचे पती विष्णू देसाई हे शिराळाहून त्यांना न्यायला नवे तांबवे येथे आले होते. जेवण करून रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दाेघेही शिराळाला जाण्यासाठी निघाले.
घरातून बाहेर पडल्यानंतर दोन - तीन किलोमीटर अंतरावर येवलेवाडी फाट्याच्या पूर्वेस नवे तांबवे ते येवलेवाडी फाटा रस्त्यावर कासेगावकडून नवे तांबवेच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टरच्या रिकाम्या ट्रॉलीला त्यांची दुचाकी घासली. अरुंद रस्त्यावर धक्का बसल्याने देसाई यांची दुचाकी घसरली. पाठीमागे बसलेल्या सुजाता या रस्त्यावर पडल्या.
याचवेळी त्यांचा उजवा हात ट्रेलरच्या मागच्या चाकाखाली सापडला. हाताला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. त्यांना तत्काळ कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
वडिलांची सेवा करण्यासाठी माहेरी गेलेल्या सुजाता देसाई यांच्या अपघातीमृत्यूमुळे नवे तांबवे व शिराळा येथे शोककळा पसरली. सुजाता देसाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.