दुकाने उघडण्यावर व्यापारी संघटना नरमल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:38+5:302021-07-09T04:17:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी व्यापारी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यासंदर्भात गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील दुकाने सुरू करण्यासाठी व्यापारी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यासंदर्भात गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत दुकाने उघडण्याच्या भूमिकेवर संघटना नरमल्या. जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याची ग्वाहीही संघटनांनी दिली.
महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवसाय व बाजारपेठेतील दुकाने उघडण्याचा इशारा काही व्यापारी संघटनांनी दिला होता. त्या संदर्भात सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी व्यापारी प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी नगरसेवक शेखर माने. रेडिमेड गारमेंट कापड असोसिएशनचे अध्यक्ष शामजी पारीख, कापड पेठ असोसिएशनचे हरिश लालन, सराफ असोसिएशनचे सचिव पंढरीनाथ माने, गणपत पेठ असोसिएशनचे बाळासाहेब खेराडकर, मारुती रोड व्यापारी असोसिएशनचे तांबोळी तसेच मोबाईल असोसिएशनचे अजिंक्य घोरपडे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा प्रशासनाचा कोणताही अधिकृत आदेश आल्याशिवाय दुकाने व व्यवसाय सुरू करणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जाईल, अशी हमी संघटनांकडून देण्यात आली. पोलीस निरीक्षक सिंदकर म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणताही व्यवसाय सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी. व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. माने म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून सांगलीची बाजारपेठ लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्यापाऱ्यांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले.