व्यापाऱ्यांचा आज सांगलीत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:27 AM2021-04-08T04:27:33+5:302021-04-08T04:27:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सात दिवस व्यापारी दुकाने बंद करण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. शासनाने तातडीने हा आदेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सात दिवस व्यापारी दुकाने बंद करण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. शासनाने तातडीने हा आदेश मागे घ्यावा, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, तरीही शासन निर्णयावर ठाम असेल तर आम्ही शुक्रवारी सर्व दुकाने उघडणार, असा इशारा आ. सुधीर गाडगीळ यांनी बुधवारी व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिला.
गाडगीळ यांच्या कार्यालयात बुधवारी व्यापारी प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी अतुल शहा, विराज कोकणे, अरुण दांडेकर या व्यापारी प्रतिनिधींसह पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, दीपक माने आदी उपस्थित होते. बैठकीत व्यापाऱ्यांनी संपूर्ण महिनाभर दुकाने बंद करण्यास विरोध केला. अतुल शहा म्हणाले की, अशा निर्णयाने व्यापारी उद्ध्वस्त होतील. गेल्या दोन वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील व्यापारी विविध संकटांनी त्रस्त आहेत. त्यात पुन्हा लॉकडाऊनची भर नको.
कोकणे म्हणाले की, शासनाने विकेंड लॉकडाऊन असे नाव देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे. एक महिना व्यापार बंद ठेवून व्यापारी जगणार तरी कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गाडगीळ म्हणाले की, शहरातील व्यापारी आजपर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळत आले आहेत. सॅनिटायझर, सुरक्षित अंतर व मास्कचा वापर करून व्यापार करत आहेत. अशा स्थितीत आठवड्यातून दोन दिवस लॉकडाऊन केल्यास सर्व व्यापारी त्याला पाठिंबा देतील, मात्र महिनाभर लॉकडाऊनची सक्ती आम्ही सहन करणार नाही. आम्ही सांगलीकर म्हणून गुरुवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर याप्रश्नी मोर्चा काढणार आहोत. मोर्चाद्वारे प्रश्न सुटला नाही, तर शुक्रवारी सांगली शहरातील सर्व दुकाने आम्ही खुली करू, असा इशारा त्यांनी दिला.
चौकट
गुन्हे दाखल करा
गाडगीळ म्हणाले की, मी स्वत: व्यापाऱ्यांची दुकाने उघडून देईन. माझ्यासह व्यापाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल करायचे आहेत ते सरकारने दाखल करावेत. आम्ही त्यासाठी तयार आहोत.