महापुराच्या भीतीने व्यापारी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:37+5:302021-07-24T04:17:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुराच्या भीतीने शहरातील व्यापारी वर्ग धास्तावला आहे. शुक्रवारी दिवसभर मुख्य बाजारपेठेत दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापुराच्या भीतीने शहरातील व्यापारी वर्ग धास्तावला आहे. शुक्रवारी दिवसभर मुख्य बाजारपेठेत दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी नेण्यासाठी व्यापाऱ्यांची धावाधाव सुरू होती. बहुतांश दुकाने रिकामी करण्यात आली आहेत.
२०१९ मध्ये आलेल्या महापुरात शहरातील बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले होते. संपूर्ण बाजारपेठ आठ दिवस पाण्याखाली होती. महापुराचा अंदाज न आल्याने व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य बाहेर काढले नव्हते. त्यामुळे यंदा शहरावर पुराची छाया गडद होताच व्यापारी वर्ग सावध झाला आहे. त्यातच कोरोनामुळे गेली साडेतीन महिने बाजारपेठ बंदच आहे. शुक्रवारी महापालिका प्रशासनाने दुकानातील साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याची मुभा दिली. सकाळी आठ वाजल्यापासून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. दिवसभर बाजारपेठेत व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती. अवजड वाहने आणून साहित्य इतरत्र नेण्यात येत होते. त्यात पावसाचा जोरही कायम असल्याने अडथळे येत होते. अनेक व्यापाऱ्यांनी मागील पुराचा अंदाज घेत दुसऱ्या मजल्यावर दुकानातील साहित्य ठेवले.