सांगलीतील व्यापारी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:19 AM2021-07-15T04:19:19+5:302021-07-15T04:19:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दुकाने उघडण्यास परवानगी देणार नसाल तर किमान व्यापाऱ्यांचा खर्च भागविण्यासाठी भीक तरी द्या, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दुकाने उघडण्यास परवानगी देणार नसाल तर किमान व्यापाऱ्यांचा खर्च भागविण्यासाठी भीक तरी द्या, अशी मागणी करत बुधवारी सांगलीतील व्यापारी रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील हरभट रोडवर हातात फलक घेऊन मानवी साखळी करत व्यापाऱ्यांनी शासनाचा निषेध केला. व्यापारी एकता असोसिएशनच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात हाॅटेल, किराणा, भाजी विक्रेता, कापड, सराफी व्यापार संघटनांसह सर्वपक्षीय कृती समितीनेही सहभाग घेतला होता.
गेल्या दोन वर्षांपासून शहरातील व्यापारी अडचणीत आहेत. महापूर व कोरोनामुळे बाजारपेठेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या तीन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवली आहेत. व्यापाऱ्यांवर बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचारी पगार, दुकानभाडे, घरखर्च, वीजबिल, स्थानिक कर, जीएसटीचा बोजा वाढत चालला आहे. या खर्चापोटी कसलीही मदत शासनाने केलेली नाही. दुकाने उघडण्यास परवानगी देणार नसाल तर किमान खर्चाची रक्कम भीक म्हणून द्यावी, अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी आंदोलन केले.
हरभट रोडवर सकाळी साडेअकरा वाजता व्यापारी संघटनांसह विविध राजकीय पक्ष व सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हातात ‘भीक मांगो’चे फलक घेऊन व्यापाऱ्यांनी साखळी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी शासन व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, जिल्ह्यात कडक निर्बंधांमुळे बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार, दुकान भाड्यासह इतर खर्च भागविणेही व्यापाऱ्यांना मुश्कील झाले आहे. या नुकसानाला शासन व जिल्हा प्रशासनच जबाबदार आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून व्यापार सुरू करण्याची ग्वाही दिली होती; पण पुन्हा लाॅकडाऊनचा आदेश काढला. तीन महिने दुकाने बंद असतानाही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यातच शहराचा पाॅझिटिव्हिटी दर कमी असतानाही कडक निर्बंध लादले आहेत. याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले.
या आंदोलनात माजी आमदार नितीन शिंदे, सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, उर्मिला बेलवलकर, किराणा व्यापार संघटनेचे अरुण दांडेकर, हाॅटेल संघटनेचे लहू भडेकर, शैलेश पवार, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर, अमर पडळकर यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.