व्यापाऱ्यांचे सांगलीत बेमुदत उपोषण सुरू
By admin | Published: December 15, 2014 10:56 PM2014-12-15T22:56:35+5:302014-12-16T00:03:46+5:30
एलबीटीला विरोध : ‘बंद’ला महापालिका क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद
सांगली : स्थानिक संस्था कर (एलबीटी)च्या विरोधात सांगलीतील कृती समितीने आजपासून महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाया मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लेखी आदेश येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही व्यापाऱ्यांनी केला. या आंदोलनाला पाठिंब्यासाठी पुकारलेल्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
एलबीटी हटावसाठी गेल्या दीड वर्षापासून सांगलीत कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्याभरात महापालिकेनेही एलबीटी वसुलीसाठी कडक पावले उचलत ३० हून अधिक व्यापाऱ्यांवर न्यायालयात फौजदारी दाखल केली आहे. तसेच व्यापाऱ्यांचे दफ्तर तपासणीच्या हालचाली सुरू आहेत. यापूर्वी कृती समिती व ‘फॅम’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एलबीटी हटविण्याची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी पर्याय मिळेपर्यंत कर भरण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून सांगलीत व्यापाऱ्यांनी एलबीटी हटावसाठी एल्गार पुकारला आहे.
सकाळी गणपती मंदिरासमोर व्यापाऱ्यांच्यावतीने आरती करण्यात आली. त्यानंतर सर्व व्यापारी सराफकट्टा, कापड पेठमार्गे महापालिकेच्या शाळा क्रमांक एकनजीक जमा झाले. तिथे त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, अनंत चिमड, सुरेश पटेल या चार व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी बोलताना शहा व कोकणे म्हणाले की, एलबीटी हटविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक आहेत. त्यांचा एलबीटी व जकात हटावला पाठिंबा आहे. पण राज्यातील २६ महापालिकांतील अधिकारी मात्र व्यापाऱ्यांवर फौजदारी, तसेच बँक खाती सील करण्याची कारवाई करीत आहेत. कोल्हापुरात तीन हजार, परभणीत १२००, तर सोलापुरात साडेतीनशे व्यापाऱ्यांवर फौजदारी केली आहे. एलबीटी हटणार असेल, तर कारवाई कशासाठी सुरू आहे? कारवाई मागे घ्यावी, यासाठी आमचे आंदोलन आहे. एलबीटी हटाव व फौजदारी कारवाई थांबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत, हे आदेश निघेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात परभणी व्यापारी संघटनेचे आनंद भाकळे, अतुल शेळके, विक्रम रामसिघानी यांनीही सहभाग घेतला. शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार, तसेच सांगलीतील वैद्यकीय संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मुकेश चावला, सुदर्शन माने, गौरव शेडजी, धीरेन शहा, आप्पा कोरे, प्रसाद कागवाडे, सोनेश बाफना आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)