वाळवा येथील दर्ग्यात नववर्ष स्वागताची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:23 AM2021-01-02T04:23:02+5:302021-01-02T04:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : येथील माळभाग परिसरातील बंगालबाबा दर्ग्यात नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला गत २० वर्षांपासून शाकाहारी स्नेहभोजनाचा उपक्रम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : येथील माळभाग परिसरातील बंगालबाबा दर्ग्यात नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला गत २० वर्षांपासून शाकाहारी स्नेहभोजनाचा उपक्रम राबविला जात आहे. दरवर्षी ३१ डिसेंबरला दर्ग्याचे मुजावर इलाई मुजावर हे तरुणांना व्यसनापासून रोखण्यासाठी याचे आयोजन करतात. यंदा कोरोनामुळे मर्यादित प्रमाणात कार्यक्रम पार पडला.
वीस वर्षांपूर्वी या दर्ग्याबाबत नागरिकांच्यात जागृती नव्हती. दर्गा परिसरात अस्वच्छता होती. इलाई मुजावर हे त्याकाळी हुतात्मा साखर कारखान्याचे कामगार आहेत. नित्याच्या कामासोबत ते दर्ग्यात बंगालबाबा यांच्या स्थानाची सुद्धा सेवा करू लागले. दर्ग्याची जमीन धनदांडग्यानी कित्येक वर्षांपूर्वी लाटली आहे. दर्ग्याच्या जागेविषयीसुद्धा कुरबुरी आहेत. त्यातून सुद्धा त्यांनी हिंमत न सोडता आजअखेर अखंड सेवा सुरू ठेवली आहे. कसलेही उत्पन्न नसताना आज दर्ग्याचे रूबाबदार बांधकाम त्यांनी पूर्ण केले आहे.
तरुणांना व्यसनापासून दूर करून भक्तिमार्गात आणण्याचे त्यांनी काम केले आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ स्वयंप्रेणेने धान्य व पैसे एकत्रित करून ३१ डिसेंबरला स्नेहभोजनाचा आस्वाद दर्ग्यात घेतात व धार्मिक प्रार्थना करून नववर्षाचे स्वागत करतात. यावेळी विविध क्षेत्रांत वर्षभर उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचाही गौरव केला जातो.