पारंपरिक वाद्यांना आला लाखाचा भाव
By Admin | Published: August 29, 2016 12:22 AM2016-08-29T00:22:29+5:302016-08-29T00:22:29+5:30
डॉल्बी बंदीचा परिणाम : गणेशोत्सवात मागणी वाढल्याने ढोल-ताशा, बॅन्ड, बँजो पथकांचे दर तेजीत...
सदानंद औंधे, मिरज : डॉल्बीवरील बंदीमुळे गणेशोत्सवात बॅन्ड, बॅन्जो, झांजपथक, ढोलताशा, नाशिक ढोल, लेझीम, धनगरी ढोल, टाळ-मृदंग या पारंपरिक वाद्यांना मागणी वाढली आहे. बॅन्ड, बॅँजो व झांज ढोलताशा पथकांचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत.
गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीसाठी वाद्य पथकांना मोठी मागणी असल्याने बुकिंगसाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. न्यायालयाने ध्वनिप्रदूषणावर निर्बंध घालण्यापूर्वी गणेशोत्सवात डॉल्बी ध्वनीयंत्रणेची चलती होती. डॉल्बीमुळे पारंपरिक वाद्यांवर संक्रांत आली होती. मात्र गेल्या काही वर्षात पोलिसांकडून डॉल्बी बंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे व कारवाईमुळे गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. नवव्या व अखेरच्यादिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बॅन्ड, बँजो, झांज, ढोलपथक मिळविणे अवघड झाले आहे. यावर्षी विसर्जनाच्या अखेरच्यादिवशी मोठी मागणी असल्याने बॅन्ड, बॅजो, झांजपथकाचे, ढोलताशा पथकाचे दर ५० हजारांपासून लाखापर्यंत पोहोचले आहेत. बॅन्जो व झांजपथके ताशी दहा ते पंधरा हजारांची मागणी करीत आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बॅॅन्जो व झांजपथके आहेत. मिरजेसह कागवाड, सौदत्ती, चिकोडी, जमखंडी, अथणी येथील बॅन्ड पथकांचा लौकिक आहे. ‘पिलिलिली’ या कर्नाटकातील वाद्य प्रकारात ताशाच्या साथीने तुतारीसारखे पिलिलिली वाद्य वाजवित वादक नृत्य करतात. नाशिक ढोल हा सनईच्या साथीने ढोलवादनाचा प्रकार व एकाचवेळी ६० ते १०० वादकांचा ढोलताशा हा प्रकार मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. नाशिक ढोलसाठी किमान ३० हजार, तर ढोलताशा पथकासाठी एक लाख रुपये मोजावे लागणार आहेत. आर्थिक क्षमता कमी असलेल्या मंडळांची धनगरी ढोल, लेझीम, टाळ मृदंग या किमान १५ ते २० हजार रुपये दर असलेल्या स्वस्त वाद्यांना पसंती आहे. गणेशोत्सवात मागणी असल्याने वाद्यपथकांची चांगली कमाई होणार आहे. पारंपरिक वाद्यांची टंचाई असल्याने गणेशोत्सवापूर्वी महिनाभर अगोदर वाद्यपथके बुक झाली आहेत.
ढोल-ताशाची जुगलबंदी : मागणी मोठी
६० ते १०० वादक असलेल्या ढोलताशा पथकांसाठी ताशी २५ हजार रुपये दर आहे. वादकांच्या संख्येवर ढोलताशा पथकाचा दर आहे. एकाचवेळी १०० वाद्ये वाजविणारी ढोलताशा पथके डॉल्बी यंत्रणेशी स्पर्धा करीत आहेत. मिरजेत संत वेणास्वामी मुली व महिलांचे ढोलताशा पथक, समर्थ प्रतिष्ठानचे मुला-मुलींच्या ढोलताशा पथकाचा गेले महिनाभर गणेशोत्सवासाठी सराव सुरू आहे. ढोल व ताशाची जुगलबंदी असलेल्या ढोलताशा पथकांना मोठी मागणी असल्याने सांगली, मिरजेत स्थानिक वादकांच्या सुमारे दहा ढोलताशा पथकांची निर्मिती झाली आहे. गणेशोत्सवात झांजपथक व बँडसाठी ५० हजार, बँजोसाठी ७५ हजार रुपये दर आहे.