सांगलीत बायपास रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:39+5:302021-02-27T04:34:39+5:30
ओळी : आयर्विन पूल वाहतुकीला बंद झाल्याने बायपास रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. लोकमत ...
ओळी : आयर्विन पूल वाहतुकीला बंद झाल्याने बायपास रस्त्यावर वाहनाची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पूल वाहतुकीला बंद करण्यात आल्याने सांगली शहरात येणारी संपूर्ण वाहतूक बायपास रस्त्यावर वळविण्यात आली. लहान-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहनधारकांना तासनतास ताटकळत थांबावे लागत आहे.
कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलावरील अवजड वाहतूक काही वर्षांपासून बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी व लहान वाहनांनाच पुलावरून प्रवेश दिला जात आहे. त्यातच या पुलाच्या फुटपाथला अनेकदा भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फुटपाथच्या दुरुस्तीसाठी इपोक्सी ट्रीटमेंट व लोखंडी अँगलच्या वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी महिनाभर हा पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे.
या पुलावरील वाहतूक सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्याकडे वळविण्यात आली आहे. या रस्त्यावर आधीच अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यात आयर्विन पुलावरून होणारी वाहतूकही या रस्त्यावरून सुरू झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागू लागल्या आहेत. शिवशंभो चौकात तर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. माधवनगर रस्त्यावरही तीच स्थिती आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
चौकट
आयर्विन पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्याने सर्व वाहतुकीचा ताण बायपास पुलावरून आला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. तसेच छोटे-मोठे अपघात व वाहनधारकांत वादावादीचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे बायपास रस्त्यावर सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत वाहतूक पोलीस तैनात करण्याची गरज आहे. - सतीश साखळकर, जिल्हाध्यक्ष, नागरिक जागृती मंच