Sangli: गोटखिंडी, बावची परिसरातील ऊसाची वाहतूक रोखली; हुतात्मा कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे ठोकले
By संतोष भिसे | Published: October 31, 2023 05:38 PM2023-10-31T17:38:55+5:302023-10-31T17:40:13+5:30
गोटखिंडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बावची, गोटखिंडी, पडवळवाडी (ता. वाळवा) राजारामबापू पाटील साखर कारखाना व हुतात्मा किसन अहिर ...
गोटखिंडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बावची, गोटखिंडी, पडवळवाडी (ता. वाळवा) राजारामबापू पाटील साखर कारखाना व हुतात्मा किसन अहिर कारखान्यांकडे निघालेला ऊस रोखला. बावची येथे हुतात्मा कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे ठोकले.
कार्यकर्त्यांनी ऊसाच्या आठ ट्रक्टरच्या टायरमधील हवा सोडून वाहतूक रोखली.
ठिकठिकाणीच्या ऊसतोडी बंद पाडल्या. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता व चालू वर्षीच्या ऊसाला मागणीनुसार दर मान्य झाल्याशिवाय ऊस सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनीही त्याला सहमती दर्शविली. त्यानंत आंदोलन तंडावले.
वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले, बाजारपेठेत साखरेचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३८५० रूपये आहे. यावर्षी ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी काही दिवस ऊसतोडी बंद ठेवाव्यात. ऊसाच्या कांडीला सोन्याची कांडीसारखा भाव आहे. तिला भंगाराच्या किंमतीत विकू नका. साखरेच्या व उपपदार्थांच्या दराचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. थोडा धीर धरल्यास प्रतिटन साडेचार ते पाच हजार रुपये भाव मिळू शकतो.
यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शीतल सांद्रे, नितीन पंडित, विलास यादव, शामराव जाधव, प्रवीण कोल्हे, गिरीश पाटील, भरत साजणे, दीपक मगदूम, सागर वळवडे, मनोज सरडे, रोहित साळुंखे, प्रवीण पाटील, सुनील कुदळे आदी उपस्थित होते.