रक्षकच बनला भक्षक! सांगलीत पोलिस कृपेने बांगलादेशी तरुणींची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:33 PM2023-02-03T17:33:09+5:302023-02-03T17:33:34+5:30
खाकीचा गैरवापर करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सांगली : शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी स्वप्नील कोळी याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पोलिस दलातील अन्य कर्मचारी उल्लेखनीय कामगिरी करत असताना, काेळीच्या कारनाम्याने खाकीवर डाग लागला आहे. दरम्यान, सांगलीत बांगलादेशी तरुणींचा वेश्या व्यवसायातील वापराचा मुद्दा चर्चेत आला आहे. रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच अत्याचार केल्याने या तरुणींची पिळवणूकही समोर आली आहे.
अल्पवयीन मुलीवर अन्याय आणि वाचा...
- शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडितेच्या घरात घुसून जानेवारी २०२२ मध्ये स्वप्नील कोळी याने अत्याचार केला होता. यानंतरही त्याने पीडितेकडून व अन्य महिलेकडून प्रारंभी दोन लाख व पाच लाख असे सात लाख रुपयांची खंडणी वसूल केली होती.
- वर्षभरापासून पीडितेवरील अन्यायाविरोधात पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर कोळीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
अधिकाऱ्यांची ठाम भूमिका अन् कारवाई
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडूनच खंडणी वसूल करणाऱ्या कोळीवरील कारवाईची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा होती. त्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात ठाम भूमिका घेत कोळीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळेच कोळीवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणीच्या असहायतेचा घेतला गैरफायदा
- बांगलादेशातील तरुणींना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून सांगलीत आणत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे. यात महिलांकडून बनावट आधार कार्डही तयार करून त्याचा वापर केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार प्रकाशझोत टाकला आहे.
- पोलिसांच्या कारवाईची शक्यता लक्षात घेऊन बांगलादेशी तरुणींना तेथून हलविले होते. पोलिस कोळी याने तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. शिवाय खंडणीही उकळल्याने गंभीर प्रकार समोर आला आहे.
रक्षकच बनला भक्षक
समाजातील कोणताही घटक असो त्याचे संरक्षण व अन्याय झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस नेहमीच प्राधान्य देतात. याचमुळे अन्याय झालेल्या घटकाला न्याय मिळतो. संशयित स्वप्नील कोळी याने मात्र, रक्षण न करता खाकीचा गैरवापर करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले.