कोल्हापुरातून मराठवाड्याकडे रेल्वे धावताहेत ओव्हरफुल्ल, उन्हाळी सुट्ट्यांसाठी अतिरिक्त गाड्यांची मागणी
By संतोष भिसे | Published: April 11, 2023 06:51 PM2023-04-11T18:51:45+5:302023-04-11T18:52:07+5:30
कोल्हापूर - गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस तर बाराही महिने फुल्ल
सांगली : कोल्हापुरातून सुटणाऱ्या मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक भरुन धावत आहेत. तरीही या मार्गावर पुरेशा गाड्या सोडण्याचे सौजन्य रेल्वेने दाखवलेले नाही. सन २०२२ या वर्षातील प्रवासी वाहतुकीची माहिती रेल्वेने दिली, त्यानुसार सर्वच गाड्या अक्षरश: ओव्हरफुल्ल धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या ओव्हरलोड असल्याने प्रवाशांसाठी उन्हाळी विशेष व नवीन रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी होत आहे. पण त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. कोल्हापुरातून महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोल्हापूर - नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस मराठवाड्यात धावते. शिवाय मिरजेतून परळी पॅसेंजर दररोज धावते. दररोज धावणारी मिरज - कलबुर्गी एक्सप्रेस काही अंशी मराठवाड्याच्या सीमेवरुन जाते. या सर्वच गाड्या सदोदीत फुल्ल असतात. कोल्हापूर - गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस तर बाराही महिने फुल्ल असते.
पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात जाण्यासाठी या मोजक्याच गाड्या असल्याने प्रवाशांना वेटिंगवर रहावे लागते. शिवाय आरक्षण न मिळाल्याने खासगी ट्रॅव्हल्स गाडीने नागपूर, औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. प्रवाशांची गर्दी पाहता या मार्गावर आणखी काही गाड्या सोडण्याची गरज आहे.
सन २०२२ मधील आकडेवारीनुसार कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस कमाईमध्ये फायद्याची ठरली आहे. तिने १० महिन्यांत २८४ फेऱ्यांतून एक कोटी ३९ हजार ४० रुपये मिळवून दिले. प्रत्येकी फेरीतून सरासरी ३५ हजार ३४९ रुपये उत्पन्न मिळाले. या गाडीतून पुण्यासह शेगाव व नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मराठवाड्यातील अनेक तरुण पश्चिम महाराष्ट्रात काम व शिक्षणासाठी राहत असल्याने त्यांच्यासाठीही अतिरिक्त गाड्यांची गरज आहे.
कोल्हापुरातून मराठवाड्यातील गाड्या ओव्हरफुल्ल
सन २०२२ या वर्षभरात गाडी क्रमांक ११४०३ नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस १८६.३७ टक्के भरुन धावली. गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर - नागपूर एक्सप्रेसने १५७.७३ टक्के प्रवासी वाहतूक केली. शिवाय गाडी क्रमांक ११०४५ कोल्हापूर - धनबाद एक्सप्रेस हीदेखील १८६.५७ टक्के क्षमतेने धावल्याची माहिती रेल्वेने दिली.