सांगलीतून पंढरीची पहिली 'रेल्वे वारी' ठरणार अनोखी

By अविनाश कोळी | Published: July 8, 2024 05:55 PM2024-07-08T17:55:49+5:302024-07-08T17:56:12+5:30

वारकरी समुदायाकडून स्थानकावर होणार कार्यक्रम

Train service to Pandharpur from Sangli station for Ashadhi Wari started | सांगलीतून पंढरीची पहिली 'रेल्वे वारी' ठरणार अनोखी

सांगलीतून पंढरीची पहिली 'रेल्वे वारी' ठरणार अनोखी

सांगली : यंदाची आषाढी वारी सांगलीकर वारकऱ्यांसाठी अनोखी ठरणार आहे. पंढरपूरला जाण्यासाठी सांगलीतून थेट रेल्वे नव्हती. काही महिन्यांपूर्वी सांगली ते परळी एक्सप्रेस गाडी मंजूर झाली आहे. या रेल्वेची यंदाची पहिली आषाढी वारी असल्याने ती संस्मरणीय करण्यासाठी वारकरी समुदायाने आषाढीच्या पूर्वसंध्येला स्थानकावर भजन, किर्तन व अभंगाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त भक्तांच्या वाऱ्या सध्या सुरु आहेत. सांगली व परिसरातील वारकऱ्यांनी सांगली रेल्वे स्थानकावरुन दररोज धावणाऱ्या सांगली-परळी एक्सप्रेसने पहिल्या वारीचा आनंद मिळणार आहे. सांगली स्थानकावरुन दररोज सांगली-परळी एक्सप्रेस सुरू झाली आहे. या गाडीची पहीली आषाढी एकादशी जल्लोषात विठ्ठल नामाच्या गजरात साजरी करण्याबाबत भक्तांना आवाहन केले आहे.

सांगली जिल्ह्यातून यंदा १ लाख विठ्ठल भक्तांनी सांगली स्टेशनवरून जून व जुलै महिन्यात सांगली ते पंढरपूर प्रवास करायचा, असा निर्धार वारकरी समुदायातर्फे करण्यात आला आहे. दररोज रात्री साडे आठ वाजता सांगली स्थानकातून ही गाडी सुटते. तिकीट दर ६५ रुपये आहे.

स्थानकावर होणार विठूनामाचा गजर

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १६ जुलै रोजी रात्री साडे सात वाजता वारकरी समुदाय सांगली स्थानकावर जमणार आहे. अभंग, भजन, किर्तन सोहळ्याच्या माध्यमातून विठूनामाचा गजर केला जाणार आहे. सांगली व परिसरातील सर्व विठ्ठल भक्तांनी सांगली रेल्वे स्टेशनवर या कार्यक्रमासाठी यावे, असे आवाहन अखिल भारतीय वारकरी समुदायातर्फे लक्ष्मण नवलाई, दत्तात्रय आंबी महाराज, हरीभाऊ माने, महादेव इसापुरे यांनी केले आहे.

पंढरपूरसाठी या गाड्या धावणार

  • रोज रात्री साडे आठ वाजता सांगलीतून गाडी क्र. ११४१२ सांगली-परळी एक्सप्रेस धावेल. ती पंढरपुरात रात्री ११ वाजता पोहचेल. पंढरपूर आगमन रात्री ११ वा.
  • सोमवार, मंगळवार व शनिवारी सायंकाळी ५:५० वाजता सांगली स्टेशनवरुन गाडी क्र. ११०२८ सातारा-दादर एक्सप्रेस उपलब्ध आहे. पंढरपूरमध्ये ती रात्री साडे नऊला पोहचेल.


पंढरपूरहून परतीचा प्रवास

  • पंढरपूर स्थानकावरुन दररोज दुपारी अडिच वाजता गाडी क्र ११४११ परळी-सांगली एक्सप्रेस गाडी आहे. सांगलीत ती सायंकाळी ६.५०ला पोहचेल.
  • सोमवार, मंगळवार, शनिवारी सकाळी ८:१० वा पंढरपूर स्टेशनवरुन गाडी ११०२७ दादर-सातारा एक्सप्रेस सुटेल. सांगली स्थानकावर ती सकाळी ११:२० वाजता पोहचेल.


अशी मिळतील तिकिटे

  • परळी-सांगली किंवा सांगली-परळी ही गाडी जनरल डब्यांची असल्याने स्थानकात दोन तासापूर्वीपासून तिकिटे उपलब्ध होतील.
  • दादर-सातारा किंवा सातारा-दादर या गाडीत जनरल, स्लीपर व एसी स्लीपर डब्बे आहेत. आरक्षित तिकीट आताच काढता येऊ शकते. जनरल तिकीट गाडी सुटण्याच्या २ तास आधी सांगली स्टेशनवर मिळतील.

Web Title: Train service to Pandharpur from Sangli station for Ashadhi Wari started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.