शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय; संजय राऊतांनी टीका
By संतोष भिसे | Published: March 3, 2023 07:33 PM2023-03-03T19:33:23+5:302023-03-03T19:33:38+5:30
सांगलीत शुक्रवारी भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.
सांगली: शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय. त्याच्या हातावर मेरा बाप चोर है असं लिहिलं होतं. तसं या ४० चोरांच्या आई, बाप, मुले, बहिण यांच्या कपाळावर गद्दार है असं लिहिलंय असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. सांगलीत शुक्रवारी भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, बजरंग पवार, हाजी सय्यद, लक्ष्मण हाक्के, अभिजित पाटील, दिगंबर जाधव, सुनिता पवार, सुजाता इंगळे, मयुर घोडके, चंद्रकांत मैगुरे, विशालसिंग रजपूत, पंडितराव बोराडे आदी उपस्थित होते. शंभूराज काटकर यांनी प्रास्ताविक केले. राऊत म्हणाले सांगली, `पन्नास खोके, एकदम ओके` ही घोषणा दोन मिनिटांत जगभरात व्हायरल झाली. जगात कोणतीही घोषणा इतकी लोकप्रिय झाली नसेल. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांविषयी असभ्य बोलणं योग्य नाही, असं मी या व्यासपीठावरुन सांगतो. पण या महाराष्ट्राच्या भावना असतील, तर माझा नाईलाज आहे. ४० जण जेथे जाताहेत, तेथे मागून व समोरुन या घोषणा दिल्या जात आहेत. हे तुम्हीच ओढवून घेतलंय.
रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी घरचं खाऊन आमदार, खासदार केले, ते ५० खोके घेऊन पळून गेले. निवडणूक आयोग मात्र शिवसेना त्यांची असे सांगतोय. शिवसेना आयोगाने निर्माण केलेली नाही. ती तुमच्या बापाने निर्माण केली काय? बाळासाहेब ठाकरे यांनी ५०-५५ वर्षांपूर्वी निर्माण केली. मराठी माणसासाठी काम करत राहिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला नगरसेवकापासून खासदार, मुख्यमंत्री केलं. ही शिवसेना निवडणूक आयोगाने उचललून शिंदेेेंच्या घशात घातली, तेव्हापासून महाराष्ट्रात वणवा पेटला आहे. त्यात गद्दार खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत.राऊत म्हणाले, कोल्हापुरात दोन खासदार, एक आमदार आणि आणखी एक अर्धा असे साडेतीन दीडशहाणे सोडून गेले. त्यांनी परत निवडून येऊन दाखवावे.
सांगली, मिरजेत पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात, मिरजेत रस्ते नाहीत. पंधरा वर्षे शिवसेनेच्या मदतीने आमदार झाले, पण रस्तेही करु शकले नाहीत. महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी खोक्याच्याही वर घेतलेत. टक्केवारीसाठी गॅंगवार करत आहेत. शिवसेनेतून सगळे ओरबडणारे निघून गेले आहेत. हे आऊटडेटेड सरकार सरकार आहे. सोळा आमदार सर्वोच्च न्यायालयात अपात्र ठरतील. पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम भाजप करत आहे. आमचे भांडण ४० चोरांशी नाही. त्यांना आम्ही गाडू शकतो. आमचं भांडण भाजपशी आहे. या पक्षाला खांद्यावर घेऊन मिरवलं. त्याच खांद्यावर अंत्ययात्रा काढू. कसब्याचा हम सब एक है हा पॅटर्न कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह एकत्र राहील. तेथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस एकत्र होते. पोलिसांच्या गाडीतूनच पैसा वाटला जात होता. तरीही भाजपचा दारुण पराभव झाला.
राऊत म्हणाले, कोरोनाकाळात हाहाकार माजला होता. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये मृतदेह वाहत होते. स्मशानाबाहेर रांगा होत्या. देशाची लाज गेली, पण उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख म्हणून प्राण वाचवले. ते आजारी पडल्याचा गैरफायदा घेऊन भाजपने शिंदेंना हाताशी धरुन सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले. शिवसेनेत शिंदेना पदे, सत्ता दिली, तरीही ठाकरे आजारी असताना कारस्थान करत होते. अशी निर्घृण माणसे सत्तेवर आहेत. त्याचा बदला, सूड महाराष्ट्राने घेतला पाहिजे. तुमची झुंडशाही मोडून काढण्यासाठी आमची गुंडशाहीच पाहिजे. निवडणूक हरतोय असे वाटले हिंदू- मुस्लिम, भारत- पाकिस्तानचे मुद्दे उचलले जातात. त्यापेक्षा भारत- चीन सुरु करा. चीनने अख्खं लडाख घेतलंय. त्याबद्दल मोदी बोलत नाहीत. काश्मिरमध्ये पंडितांच्या रोज हत्या होताहेत, त्याबद्दल मोदी बोलत नाहीत. ही कसली मन की बात? पण अंदर की बात २०२४ ला कळेल.
चंद्रकांत पाटील कोथरुडला उभे राहणार का?
दरम्यान, पत्रकार बैठकीत राऊत म्हणाले, पुण्याची हवा पालटल्याचे कसब्याच्या निकालाने दाखवून दिले आहे. आता चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरुडमध्ये उभा राहणार का? कसब्यामध्ये शिवसेनेच्या ३५ ते ४० हजार मतांच्या जोरावर भाजपचा उमेदवार निवडून यायचा. हा बालेकिल्ला आता ढासळला आहे. राहुल गांधींसह माझे व अनेक मोठ्या नेत्यांचे फोन फडणवीस सरकारने टॅप केले. गुन्हेगारी कृत्य केले. ते करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला आजच पदोन्नती मिळाली. माझ्याबद्दल हक्कभंगाची तक्रार करणाऱ्यालाच चौकशी समितीचा सदस्य म्हणून घेतले. याविषयी शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. ही समिती न्याय कसा देऊ शकेल? विधीमंडळाला मी चोर म्हंटलेले नाही. ४० गद्दारांपुरता उल्लेख केला होता.