गाव बंदमुळे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:14+5:302021-07-20T04:19:14+5:30
सांगली : कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. यामुळे आर्थिक ...
सांगली : कोरोनाचा धोका वाढत असल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांना सध्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारण थंडावले आहे.
--------------------
खानापूर तालुक्यात बंधाऱ्यांमुळे दिलासा
खानापूर : तालुक्यातील विविध गावांमधील ओढ्यांवर व अग्रणी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यांमुळे सध्या पाण्याची चांगली उपलब्धता झाली आहे. अग्रणी नदीवरील बंधारे टेंभूच्या पाण्याने भरले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खानापुरातील तलाव भरला आहे, तर सुलतानगादे येथील तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. यामुळे नागरिकांना डिसेंबरपर्यंत तरी पाण्याबाबत दिलासा मिळाला आहे.
--------------------
रस्त्याचे काम रखडले
पुनवत : तालुक्यात सध्या रत्नागिरी-गुहाघर मार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील शिराळा ते पावनेवाडी येथील काम रखडले आहे. यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून जाताना कसरत करावी लागत आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
-----------
आषाढातही वरुणराजाची वक्रदृष्टी
पुनवत : पावसाचे आगार असणाऱ्या शिराळा तालुक्यात सध्या पावसाने दडी मारली आहे. आषाढ महिन्यात या भागात मुसळधार पाऊस कोसळत असतो. मात्र यंदा वरुणराजाने वक्रदृष्टी केली आहे. वारणा नदीतही पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
-------------
काटेरी झुडपांमुळे वाहतुकीस धोका
संख : जत तालुक्यातील अनेक रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. विशेषत: मोठ्या वळणावर झुडपांमुळे वारंवार अपघात होत आहेत. यामुळे ही झुडपे काढण्यात यावीत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
---------------