शासन आदेश डावलून चौदा तलाठ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:47+5:302021-07-09T04:17:47+5:30
कोकरुड : कोरोनामुळे सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. असे असताना तत्कालीन प्रांताधिकारी नागेश ...
कोकरुड : कोरोनामुळे सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. असे असताना तत्कालीन प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या बदलीला कारणीभूत असलेल्या शिराळा, वाळवा तालुक्यातील १४ तलाठ्यांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधूनच होत आहे.
प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तलाठ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे तलाठी आणि नागेश पाटील यांच्यात वाद होता. या वादातून पाटील यांच्या बदलीसाठी तलाठी संघटनेचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाची दखल घेऊन पाटील यांची सोलापूर येथे बदली झाली आहे. या रिक्त जागेवर प्रांताधिकारी म्हणून डॉ. विजय देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. मागील काही दिवसांत शिराळा, वाळवा तालुक्यातील १४ तलाठ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शासनाने बदल्या करु नका, असे सांगूनही बदल्या कशा झाल्या, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. या १४ तलाठ्यांनंतर शिराळा, वाळवा तालुक्यातील आणखी ५६ तलाठ्यांच्याही बदल्या होणार आहेत, अशी चर्चा आहे. कोरोनाच्या संकटातही अधिकाऱ्यांना तलाठ्यांच्या बदल्यांतच रस का, असाही प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.