बदल्या, शिलाई यंत्र घोटाळ्याचे पोस्टमार्टम

By admin | Published: February 13, 2016 12:13 AM2016-02-13T00:13:41+5:302016-02-13T00:26:19+5:30

जिल्हा परिषद सभा : सदस्यांकडून अधिकाऱ्यांचा पंचनामा; म्हैसाळ योजनेकडे दुर्लक्षाबद्दल पालकमंत्र्यांचा निषेध

Transfers, stitching scandal Postmortem | बदल्या, शिलाई यंत्र घोटाळ्याचे पोस्टमार्टम

बदल्या, शिलाई यंत्र घोटाळ्याचे पोस्टमार्टम

Next

सांगली : चार शिक्षकांच्या आपसी बदल्या आणि शिलाई यंत्रे खरेदी घोटाळ्यावरून जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेतच अधिकाऱ्यांचे पोस्टमार्टम केल्यामुळे अधिकाऱ्यांची फजिती झाली. नरमाईची भूमिका घेऊन चार शिक्षकांच्या आपसी बदल्या रद्द करण्याची नामुष्की अधिकाऱ्यांवर आली. घोटाळ्याचा तपास करण्यासाठी सात अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करून वादावर पडदा टाकण्यात आला. दरम्यान, निम्मा जिल्हा दुष्काळात होरपळत असताना म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्याऐवजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत बेजबाबदार विधान करून जिल्हा परिषद सदस्यांचा अपमान केल्याबद्दल पालकमंत्र्यांचा सभागृहात निषेध करण्यात आला.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. रणधीर नाईक म्हणाले की, समाजकल्याण विभागाकडून आणि वाळवा पंचायत समितीकडून शिलाई यंत्रे एकाच कंपनीची खरेदी केली आहेत. परंतु, यामध्ये यंत्रामागे दोन हजार रुपयांची तफावत आहे. मोठा आर्थिक घोटाळा झाला असून, याची सखोल चौकशी करावी. यावेळी अधिकाऱ्यांनी वाळवा आणि जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून खरेदी करण्यात आलेली शिलाई यंत्रे वेगवेगळ्या कंपन्यांची असल्याचे सांगून बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर नाईक म्हणाले की, ज्यावेळी वाळवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून खरेदी केलेल्या शिलाई यंत्राचे बॉक्स सभागृहात आणले, त्यावेळी दोन्ही यंत्रांचे बॉक्स एकच होते. वाळवा पंचायत समितीने खरेदी केलेल्या यंत्राची किंमत २ हजार ९९० रुपये, तर जिल्हा परिषदेकडून खरेदी केलेल्या यंत्राची किंमत ३०५० रुपये होती. दोन्हीच्या खरेदीत ६० रुपयांचा फरक होता. उर्वरित साहित्यासाठी वाळवा पंचायत समितीने प्रति नग ८६०, तर जिल्हा परिषदेने प्रति नग २८०० रुपये खर्च केला आहे. दोन्ही कंपन्यांचे यंत्र एकच असताना उर्वरित साहित्य खरेदीमध्ये दोन हजार रुपयांचा फरक कसा?
यावेळी नाईक यांनी धारेवर धरल्याने अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. अखेर अध्यक्षा होर्तीकर यांनी अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सात सदस्यांची चौकशी समिती नेमून वादावर पडदा टाकला.
आपसी बदल्याने आलेल्या चार शिक्षकांची वेगळ्याच ठिकाणी का नियुक्ती केली, असा प्रश्न खरमाटे, सुरेश मोहिते, संजीवकुमार सावंत, प्रकाश देसाई आदी सदस्यांनी उपस्थित केला. यावर शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी, शासन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बदल्यांमध्ये बदल करण्याचे अधिकार असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांना चुकीच्या पध्दतीने अधिकाराचा वापर करण्यास कोणी सांगितले, असे म्हणून सदस्यांनी धारेवर धरले. अखेर चार शिक्षकांच्या आपसी बदल्या रद्द करण्यात येतील, असे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.
म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले नसल्यामुळे जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना पालकमंत्री पाटील यांनी, पैसे भरल्याशिवाय म्हैसाळ योजनेबद्दल बोलू नका, असे म्हणून आम्हाला जिल्हा नियोजन समिती सभेत खाली बसविले. आमची कोणतीही बाजू त्यांनी जाणून घेतली नाही. याबद्दल पालकमंत्र्यांचा निषेध करीत असल्याचे सदस्य राजेंद्र माळी यांनी सांगितले. याला लगेच प्रकाश कांबळे यांनी पाठिंबा देऊन अनुमोदनही दिले. यावरून भाजपप्रेमी सदस्यांची पंचाईत झाली. म्हैसाळ योजनेच्या वीज बिलासाठी साखर कारखान्यांनी तीन कोटीपर्यंत रक्कम भरली आहे. उर्वरित वीज बिल टंचाईतून भरावे, अशा मागणीचा ठराव राजेंद्र माळी यांनी मांडला.
रणधीर नाईक यांनी शिराळा आणि वाळवा तालुक्यातील सिंचन योजना चालू आहेत, म्हणून तेथील पिकांच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचे सांगितले. या दोन्ही तालुक्यातील योजनांचे वीज बिल शासनाने टंचाईतून भरण्याच्या मागणीचा ठराव केला. यास वाळव्याचे सभापती रवींद्र बर्डे यांनी अनुमोदन दिले. टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनांसाठीही शासनाने टंचाईतून वीज बिल भरण्याची मागणी फिरोज शेख, आटपाडी पंचायत समिती सभापती सुमन देशमुख यांनी केली. (प्रतिनिधी)



आबांच्या पुण्यतिथीला तासगाव, कवठेमहांकाळमध्ये सुट्टी
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांची दि. १६ रोजी पुण्यतिथी असून त्यादिवशी तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. हा दिवस रविवारी शाळा घेऊन भरून काढण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी सांगितले.


सभेतील महत्त्वाचे निर्णय

पैशासाठी फायली अडविल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई
संजीवकुमार सावंत यांच्याकडून म्हैसाळ योजनेचे वीज बिल भरण्यासाठी स्थानिक विकास योजनेतील ५१ हजार रूपये
शिक्षकांच्या अंशदायी पेन्शन योजनेतील कपात रकमांची पावती देणार
शाळेतील मुलांना टॅबचा लवकरच पुरवठा
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचाऱ्यांना यापुढे नियमित पगार
पलूस पंचायत समितीच्या उपअभियंत्याच्या पदभारावरून सदस्यांमध्ये खडाजंगी
कुची येथील इको व्हिलेज योजनेतील कामाची चौकशी
तासगाव गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव
बायोमेट्रिक हजेरी यंत्र बंद असून कंपनीवर कारवाई
चिंचणी आरोग्य केंद्राचे वीज बिल त्वरित भरण्याची सूचना
इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दुष्काळी भागातील गरोदर महिलांना गोळ्या पुरविणार

Web Title: Transfers, stitching scandal Postmortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.