रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:22 PM2023-07-21T14:22:06+5:302023-07-21T14:22:59+5:30

एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली

Transportation of one and a half thousand dead bodies by railway in three years, Left an income of four and a half crores | रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

googlenewsNext

सदानंद औंधे

मिरज (जि. सांगली) : मध्य रेल्वेने गेल्या तीन वर्षांत पार्सल बोगीतून तब्बल १५४० मृतदेहांची वाहतूक केली. त्यासाठी सुमारे ४ कोटी ६२ लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला. मुंबई विभागात सर्वाधिक १४८७ मृतदेहांची वाहतूक झाली आहे. मृतदेहासाठी मालवाहतुकीची बोगी रिकामी ठेवावी लागत असल्याने हे नुकसान झाले आहे.

देशभरात हजारो किलोमीटर लांब अंतरावर मृतदेह वाहून नेण्यासाठी लांब पल्ल्याची रेल्वे सोयीची ठरते. मुंबईतून बिहार, आसाम, दक्षिण भारत, दिल्ली यासह परराज्यात दूरच्या ठिकाणी रस्त्याने मृतदेह नेणे फारच महाग व वेळखाऊ आहे. अशा वेळी रेल्वे वाहतूक अत्यंत सोयीची, कमी खर्चिक व सुरक्षित ठरते. त्यासाठी मेल, एक्स्प्रेस गाडीच्या पार्सल बोगीचा वापर होतो. गाडीच्या पहिल्या किंवा शेवटच्या पार्सल बोगीत मृतदेह ठेवला जातो.

एक्स्प्रेसमध्ये प्रत्येकी चार टन क्षमतेच्या दोन पार्सल बोगी असतात. मृतदेह ठेवलेल्या बोगीत अन्य कोणतेही साहित्य भरले जात नाही. त्यासाठी ३० हजारांच्या महसुलावर पाणी सोडावे लागते. इतके नुकसान सोसल्यानंतरही सामाजिक बांधीलकी म्हणून मृतदेहाची वाहतूक केली जाते. संबंधित मृताचा अंतिम प्रवास त्याच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी पार्थिव त्याच्या प्रदेशात पोहोचवले जाते.

मृतदेह वाहतुकीचे शुल्कही अत्यल्प ठेवण्यात आले आहे. मुंबईतून उत्तर व दक्षिण भारतात लांब पल्ल्यावर मृतदेह नेण्यासाठी फक्त एक ते दीड हजार रुपये आकारण्यात येतात. कोरोना काळात २०२० पासूनच्या गेल्या तीन वर्षांत १५४० मृतदेहांची वाहतूक झाली. त्यासाठी तितक्याच बोगी फक्त मृतदेहासह म्हणजे रिकाम्याच धावल्या. त्यामुळे ४ कोटी ६२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.

तीन वर्षांतील विभागनिहाय मृतदेह वाहतूक

  • मुंबई १,४८७
  • भुसावळ ४७
  • नागपूर २
  • पुणे ४
  • एकूण १,५४०
     

मुंबईतून परप्रांतीय मजुरांच्या मृतदेहांची वाहतूक

मुंबईत परप्रांतीय मजुरांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे तेथून सर्वाधिक मृतदेहांची वाहतूक होते. तीन वर्षांत एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली आहे. सोलापूर विभागात एकाही मृतदेहाची वाहतूक झालेली नाही.

बर्फाच्या पेटीतून वाहतूक

रेल्वेतून मृतदेह वाहतुकीसाठी नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते बर्फाच्या पेटीत ठेवूनच रेल्वेकडे सोपवावे लागते. रेल्वेकडे विनंती केल्यानंतर एका दिवसात पार्सल बोगी उपलब्ध करून देण्यात येते.

Web Title: Transportation of one and a half thousand dead bodies by railway in three years, Left an income of four and a half crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.