इस्लामपूर परिसरात बारा केंद्रांवर कोरोनाचे उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:26 AM2021-04-24T04:26:49+5:302021-04-24T04:26:49+5:30
इस्लामपूर : शहरासह तालुक्यात बारा केंद्रांवर कोरोनावरील उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी वाळवा तालुक्यात ...
इस्लामपूर : शहरासह तालुक्यात बारा केंद्रांवर कोरोनावरील उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी वाळवा तालुक्यात मृत्यूदर वाढल्याने इस्लामपूरच्या स्मशानभूमीत रोज पाच ते सहा जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वेगळी आहे. साखळी तोडण्यासाठी विविध उपाय केले तरी नागरिक खुलेआम रस्त्यावर फिरताना दिसतात.
शहरातील कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय- इस्लामपूर, प्रकाश हॉस्पिटल, गोसावी हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, शुश्रूषा हॉस्पिटल, साई मल्टिहॉस्पिटल, इस्लामपूर मल्टिस्पेशालिटी यासह आष्टा येथील ग्रामीण रुग्णालय, अण्णासाहेब डांगे हॉस्पिटल, आष्टा क्रिटीकेअर अशी एकूण १२ कोविड केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये सरासरी रोज साडे चारशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असले तरी मृत्यूदरही वाढत आहे. इस्लामपूर स्मशानभूमीत रोज पाच ते सहा कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले जातात, तर काहीजणांचे नातेवाईक परस्पर अंत्यसंस्कार करतात.
इस्लामपूर, आष्टा नगरपालिका आणि ग्रामपंंचायतींच्या माध्यमातून मृतदेहांवर अंंत्यसंस्कार केले जातात. मृत्यूदर वाढत असल्याने अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. ही यंत्रणा सध्या अपुरी पडत असून रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठीही अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. नगरपालिकेकडे अद्याप शववाहिका नाही. त्याचा त्रास नातेवाईकांना होत आहे.
कोट
कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांना अटकाव केला जात आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या वतीने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांवर ताण आहे. आमच्या लोकराज्य विद्या फौंडेशनला अंत्यसंस्कार करण्यास परवानगी द्यावी.
- चंद्रशेखर तांदळे, लोकराज्य विद्या फौंडेशन