मिरज-कागवाड मार्गावर झाडांची खुलेआम कत्तल, वाढलेल्या फांद्या सोडून थेट खोडावरच कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:27 PM2022-09-26T13:27:03+5:302022-09-26T13:27:32+5:30
झाडे कोणाच्या आदेशानुसार काढली यांची चर्चा
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : मिरज-कागवाड या राज्य महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्ताच्या वाढलेल्या फांद्या काढणे अपेक्षित असताना संपूर्ण झाडाचीच कत्तल केली आहे. अनेक झाडे काढून टाकळी आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ताच्या कडेला झाडेच नसल्याने ही झाडे कोणाच्या आदेशानुसार काढली यांची चर्चा सुरू आहे.
मिरज-कागवाड राज्य महामार्गावर कागवाड ते मिरज प्रवास करताना अनेक ठिकाणी रस्ताच्या दुतर्फा मोठ्या झाडाच्या फांद्या वाहनधारकांसाठी धोक्याच्या ठरत आहेत. एखादी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांच्यात भीतीचे वातावरण आहे.
मिरज-कागवाड हा कर्नाटकात जाणारा मुख्य माग आहे. या महामार्गावरून दररोज हजारो वाहनाची वाहतूक सुरू असते. या रस्ताच्या दोन्ही बाजूंनी मोठमोठी झाडे आहेत. झाडाच्या फांद्या अडव्या-तिडव्या वाढून रस्त्यावर मध्यभागी आल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा जोराचा वारा सुटल्यावर एखादी फांदी रस्त्यावरच पडते. पावसाळ्यात तर प्रत्येक वर्षी किमान दोन ते तीन वेळा पावसाने व सुटलेल्या वाऱ्याने झाडे व फांद्या उन्मळून पडतात. अशावेळी वाहतूक ठप्प होते. तेव्हा वाहनधारकांना तासगाव फाटा, विजयनगर मार्गे किवा म्हैसाळ येथील जुना रस्ता या मार्गावरून प्रवास करावा लागतो.
यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना या फांद्यांचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरील अनेक ठिकाणी झाडाच्या वाढलेल्या फांद्या काढून टाकणे गरजेचे असताना संबंधित विभागाने संपूर्ण झाडेच काढून टाकली आहेत. नेमके कोणाच्या आदेशानुसार ही झाडे तोडली ही चर्चा वाहनधारकांच्यात सुरू आहे. म्हैसाळ मधील अनेकांचा याचा अनुभव आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष्य देऊन झाडाच्या वाढलेल्या फांद्या ताबडतोब काढाव्यात अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
मिरज-कागवाड या राज्य महामार्गावरून आम्ही दररोज प्रवास करतो. रस्त्याच्या मध्य भागापर्यंत झाडांच्या फांद्या आल्या आहेत. वारा आल्यानंतर किवा फांद्या वाळून रस्त्यावर पडतात. रस्ता रहदारीच्या असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - प्रमोद कोळी वाहनधारक म्हैसाळ