रावसाहेब दादांनी जैन समाजाची प्रतिष्ठा वाढविली - भालचंद्र पाटील 

By अशोक डोंबाळे | Published: June 28, 2024 05:01 PM2024-06-28T17:01:25+5:302024-06-28T17:01:25+5:30

सांगलीत दक्षिण भारत जैन सभेतर्फे रावसाहेब (दादा) पाटील यांना श्रध्दांजली

Tribute to Raosaheb Patil by Dakshin Bharat Jain Sabha in Sangli | रावसाहेब दादांनी जैन समाजाची प्रतिष्ठा वाढविली - भालचंद्र पाटील 

रावसाहेब दादांनी जैन समाजाची प्रतिष्ठा वाढविली - भालचंद्र पाटील 

सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब (दादा) पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जैन समाजाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली. दादांनी समाजाला दाखवलेली दिशा आणि त्यांच्या विचारावर आपण मार्गक्रमण करून समाजाची प्रतिष्ठा अबाधित राखणे, समाजासाठी त्यांनी बघितलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने सांगलीत आयोजित श्रध्दांजली सभेत भालचंद्र पाटील बोलत होते.

चेअरमन रावसाहेब जि. पाटील म्हणाले, दादांनी परिणामांची चिंता न करता समाजहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. स्तवनिधी व हुबळी बोर्डिंगचा प्रश्न, शिष्यवृत्ती निधीमधील वाढ, सभा व शाखांचे आर्थिक स्थैर्य, सभेचे सांगलीतील शताद्बी त्रैवार्षिक अधिवेशन हे त्यांच्यामुळेच शक्य झाले. दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले.

उपाध्यक्ष दत्ता डोर्ले म्हणाले, हुबळी बोर्डिंगच्या वैभवामागे दादांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. सभा ही काही लोकांची न राहता ती सर्वांची असल्याचे दादांनी कृतीतून दाखवून दिले. खजिनदार संजय शेटे म्हणाले, सभेला दादांच्या रूपाने एक कणखर नेतृत्व लाभले. दादा पुढील दहा वर्षाचे नियोजन करीत आणि त्यासाठी ठोस पावले उचलत. सहखजिनदार अरविंद मजलेकर म्हणाले, लहान-थोर सर्वांना हवहवंस वाटणारे असे दादांचे व्यक्तिमत्त्व होते. समाजातल्या सर्व प्रश्नांची जाण त्यांना होती. ॲड. विजयकुमार सकळे म्हणाले, दादा फक्त जैन समाजाचे नव्हते तर बहुजन समाजाशी त्यांची घट्ट नाळ जोडली होती.

सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, ऋतुराज पाटील, महामंत्री दादासाहेब पाटील-चिंचवाडकर, राजेंद्र झेले, महिला महामंत्री कमल मिणचे, पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्रा. ए. ए. मुडलगी, सेक्रेटरी प्रा. आप्पासोा मासुले, वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, इचलकरंजी बोर्डिंगचे सेक्रेटरी बी. बी. हुपरे, ॲड. कुबेर शेडबाळे, कळंत्रे श्राविकाश्रमच्या अध्यक्ष अनिता पाटील, अरूण पाटील, जैन बोर्डिंगचे अध्यक्ष प्रा. राहुल चौगुले, डॉ. चंद्रकांत चौगुले, डॉ. अशोक नाईक, डॉ. जयपाल चौगुले, श्रीपाल चौगुले आदीनी श्रध्दांजली वाहिली. शेवटी णमोकार महामंत्राने श्रध्दांजली सभेची सांगता झाली. श्रध्दांजली सभेस दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, इचलकरंजी आदि सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Tribute to Raosaheb Patil by Dakshin Bharat Jain Sabha in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली