शिराळ्याच्या ‘त्रिमूर्ती’मुळे राजकीय दबदबा कायम
By admin | Published: June 4, 2016 12:18 AM2016-06-04T00:18:59+5:302016-06-04T00:33:57+5:30
आणखी एक आमदार पद : आता मंत्रिपदाकडे नजरा
विकास शहा ल्ल शिराळा
शिराळा विधानसभा मतदारसंघाचा राजकीय दबदबा पुन्हा एकदा दिसून आला आहे. या मतदारसंघास एक नव्हे, दोन नव्हे, तर तीन-तीन आमदार मिळाले आहेत. याअगोदर तीन ‘शिवाजीराव’ आमदार होते, तर आता ‘दोन शिवाजीराव व एक सदाभाऊ’ आमदार झाले आहेत.
या मतदारसंघाचा पहिल्यापासूनच राजकीय क्षेत्रात राज्याच्या राजकारणावर दबदबा आहे. शिवाजीराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदांची, विधान परिषदेच्या सभापतिपदाची तसेच प्रदेश काँग्रेसची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन अबाधित आहे. आजही ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते.
विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांनी राज्यमंत्री पदाची जबाबदारी यशस्वी पार पाडली आहे. आता भाजपमध्ये तसेच जिल्ह्याच्या राजकारणातही अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. संभाव्य राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांचे नाव अग्रस्थानावर आहे. हे दोन शिवाजीराव आमदार आहेतच, याचबरोबर या मतदारसंघातील येलूरचे शिक्षक नेते शिवाजीराव पाटील हेही विधानपरिषदेवर आमदार होते. एकाच वेळी या मतदारसंघात तीन ‘शिवाजीराव’ आमदार होते.
शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आमदार झाले. ते मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील असले तरी शिराळा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघास पुन्हा तीन आमदार मिळाले आहेत. या मतदारसंघाने राजकीय दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. सध्या आमदार शिवाजीराव नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.