ऋषिकेश, हरिद्वारची यात्रा ८ हजारांची, पण फसव्या एजंटांमुळे यात्रेचा खर्च ३० हजारांवर!
By अविनाश कोळी | Published: June 16, 2024 03:56 PM2024-06-16T15:56:09+5:302024-06-16T15:56:40+5:30
बोगस एजंटांवर कारवाई करण्याची नागरिक जागृती मंचची मागणी
अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: घरबसल्या बुकिंग करून ऋषिकेश व हरिद्वारची यात्रा अवघ्या आठ हजार रुपयांमध्ये करता येत असताना फसव्या एजंटांमुळे प्रवाशांकडून ३० हजार रुपये पॅकेजच्या माध्यमातून वसूल केले जात आहेत. नुकतीच अशी फसवेगिरीची घटना उजेडात आल्याने संबंधित एजंटवर कारवाई करण्याची मागणी नागरिक जागृती मंचतर्फे करण्यात आली आहे.
यात्रेकरूंची फसवणूक होऊ नये म्हणून मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी एक मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. त्याद्वारे प्रवाशांनी स्वत: यात्रेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रेल्वे प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या मिरज जंक्शनजवळील बोगस रेल्वे एजंटांवर सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.
तिकीट १ हजारात, राहण्याची सोय मोफत
सांगली ते ऋषिकेश, हरिद्वारचे रेल्वे तिकीट फक्त १ हजार रुपये आहे. येता-जाता प्रति व्यक्ती दोन हजार रुपये खर्च होतो. ऋषिकेश येथे भाविकांसाठी मोफत राहण्याची सोय आहे. त्याची माहितीही मंचने दिली होती. रेल्वे तिकिटाचे दोन हजार व इतर खर्च ५ ते ६ हजार गृहित धरला तर ८ हजार खर्चून एक व्यक्ती सांगली ते ऋषिकेश, हरिद्वार जाऊन सहा ते सात दिवसांत परत येऊ शकतो.
ट्रॅव्हल कंपनीसोबत एजंटांचे संगनमत
मिरजेतील काही बोगस रेल्वे एजंटांनी इचलकरंजीच्या ट्रॅव्हल कंपनीसोबत संगनमत करून सांगली स्थानकाऐवजी मिरजेतून पॅकेज टूरमार्फत जाण्यास प्रेरित करून अनेक प्रवाशांकडून हरिद्वारसाठी प्रति व्यक्ती २५ ते ३० हजार रुपये घेऊन फसवले आहे, अशी तक्रार मंचने केली आहे.
रेल्वे गाड्यांचे कन्फर्म तिकीट काढून देतो म्हणून प्रवाशांची फसवणूक करणारे इतर अनेक बोगस रेल्वे एजंट मिरज स्थानकावर कार्यरत असून, अशा सर्वांवर गुन्हा दाखल करावा. तसेच चारधामच्या यात्रेचे पॅकेज घेऊन हरिद्वारात प्रवाशांना सोडून येणाऱ्या व पॅकेज करून लुटणाऱ्या एजंटांवरही कारवाई करावी, अशी मागणी मंचने केली आहे.