पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 11:28 PM2016-03-29T23:28:24+5:302016-03-30T00:11:38+5:30

मिरजेत तयारी : नायकवडी गटाची प्रतिष्ठा पणाला

By triple contest for by-elections | पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत

पोटनिवडणुकीसाठी तिरंगी लढत

Next

मिरज : मिरजेत महापालिकेच्या प्रभाग ३० मधील पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या कन्या नाजिया शेख-नायकवडी यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने नायकवडी गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
प्रभाग ३० मध्ये अपवाद वगळता इद्रिस नायकवडी यांचे वर्चस्व राहिले आहे. जात प्रमाणपत्राबाबत तक्रारीमुळे आयेशा नायकवडी यांनी राजीनामा दिल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे.
राष्ट्रवादीने गतवेळी इच्छुक असलेले शमशोद्दीन सय्यद यांच्या पत्नी सायराबानू सय्यद यांना उमेदवारी दिली आहे. दर्गा परिसरातील या प्रभागात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या आहे. सुमारे ७० टक्के मुस्लिम मतदारात मतांची विभागणी होणार असल्याने शुभांगी रुईकर यांना उमेदवारी देऊन शिवसेनेने लाभ उठविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने येथे उमेदवार दिलेला नाही. भाजप, शिवसेनेची युती असली, तरी आमदार सुरेश खाडे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी साजीद पठाण यांची निवड रद्द झाल्यानंतर इद्रिस नायकवडी यांच्याविरोधात चांगली मते घेतली होती.
शह-काटशहच्या राजकारणामुळे मिरजेत दर्गा परिसर नेहमीच चर्चेत आहे. पठाण आणि नायकवडी यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाचा आहे. राष्ट्रवादीने नायकवडी विरोधकांना एकत्र करुन निवडणुकीत रंग भरला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज केले असले तरी राजकीय डावपेचात नायकवडी तरबेज आहेत. त्यामुळे नायकवडी यांना राष्ट्रवादी कशी टक्कर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इद्रिस नायकवडी यांचे अस्तित्व या पोटनिवडणुकीत पणाला लागले आहे. सत्ताधारी महापालिकेतील पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसत असले तरी, मिरज पॅटर्नमुळे निवडणूक समीकरणे बदलणार आहेत. शहरात एकाच प्रभागातील पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांची नेतेमंडळी उतरणार असल्याने पोटनिवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. (वार्ताहर)

जयंत पाटील गटाने कंबर कसली
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी नायकवडी घराण्यातील सदस्य निवडून येऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. तरीही नायकवडी कुटुंबातील तीन सदस्य निवडून आले. त्यानंतरच्या काळात नायकवडी व जयंत पाटील यांच्यात समेट झाला. मात्र आता पोटनिवडणुकीत नायकवडी गटाच्या पाडावासाठी जयंत पाटील गटाने पुन्हा कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे नेते व नायकवडी विरोधकांनी सायराबानू सय्यद यांना बळ दिले आहे. इलियास नायकवडी राष्ट्रवादीचे पदाधिकारी असले तरी प्रभागात ते घरातील उमेदवारासोबत राहणार असल्याचे सांगितले जाते.

Web Title: By triple contest for by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.