मिरज पंचायत समितीच्या सभापतिपदी त्रिशला खवाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:27 AM2021-01-08T05:27:23+5:302021-01-08T05:27:23+5:30
सभापती सुनीता पाटील यांनी राजीनामा दिल्याने मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार, सहायक ...
सभापती सुनीता पाटील यांनी राजीनामा दिल्याने मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डी. एस. कुंभार, सहायक निवडणूक अधिकारी गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या उपस्थितीत सभापती निवड झाली. सत्ताधारी भाजपमधून खवाटे व बेडगच्या गीतांजली कणसे इच्छुक होत्या. सभापतिपद आपल्या मतदारसंघात द्यावे, असा आमदार सुधीर गाडगीळ यांचा आग्रह होता. खा. संजय पाटील यांच्याशी चर्चाही केली होती. सदस्य विक्रम पाटील व काकासाहेब धामणे यांनी खवाटे व कणसे यांच्यापुढे बिनविरोध निवडीचा प्रस्ताव ठेवला. यातून सभापतिपदासाठी खवाटे यांचे नाव निश्चित झाले. कणसे यांनी माघार घेतल्याने त्यांना पुढील निवडीत महिन्याचा कालावधी जादा देण्याचा निर्णय झाला. विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीनेही सहकार्याची भूमिका घेतल्याने खवाटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी केली.
निवडीनंतर सभापती सुनीता पाटील, काकासाहेब धामणे, विक्रम पाटील, अशोक मोहिते, किरण बंडगर, कृष्णदेव कांबळे, सतीश कोरे, साहेबराव जगताप, उमेश पाटील, बाळासाहेब पाटील, परसू नागरगोजे यांनी खवाटे यांचा सत्कार केला.
चौकट
विरोधकांनाही मिळणार सत्तेत संधी!
सभापती, उपसभापती निवडीत सहकार्य करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत संधी देण्याचा शब्द खासदार संजय पाटील यांनी दिला होता. आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा विषय भाजप सदस्य विक्रम पाटील, राहुल सकळे, काकासाहेब धामणे यांनी उपस्थित केला. चार महिन्यांनंतर विरोधकांना उपसभापतिपदाची संधी देण्याचा निर्णय झाल्याचे विक्रम पाटील यांनी सांगितले.
चौकट
सत्ताधाऱ्यांनी शब्द पाळावा
सभापती निवडीत आम्ही अर्ज दाखल न केल्याने खवाटे यांची बिनविरोध निवड झाली. या बदल्यात विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादीला उपसभापतीची संधी देण्याचा शब्द दिला आहे. चार महिन्यांनंतर सत्ताधारी भाजप नेत्यांनी दिलेला शब्द पाळावा, असे मत निवडीनंतर विरोधी पक्षनेते अनिल आमटवणे यांनी व्यक्त केले.