गटांच्या सामर्थ्याची तिरंगी लढत
By admin | Published: October 1, 2014 11:25 PM2014-10-01T23:25:29+5:302014-10-01T23:59:23+5:30
चौघे अपक्ष रिंगणात : महाडिक, जयंत पाटील गटांची भूमिका निर्णायक
विकास शहा - शिराळा-विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख या तीन पारंपरिक गटांबरोबर निवडणूक रिंगणात नंदकिशोर नीलकंठ (शिवसेना), वैभव वाघमारे (बसपा) या पक्षीय उमेदवारांसह चार अपक्ष उमेदवारही आहेत. अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागे घेऊन शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याच्या पवित्रा घेतल्याने रंगत आली आहे.
या मतदारसंघातील राजकारण १९९५ पासून सतत बदलत आहे. दोन नाईक-देशमुख हे तीन प्रमुख गट प्रत्येकी वेगवेगळ्या भूमिकेतून पाठिंबा व्यक्त करीत होते. २००४ मध्ये तिन्ही गटांचे उमेदवार रिंगणात होते. यावेळीही हे तिन्ही गट एकमेकांसमोर आले आहेत. प्रत्येक निवडणुकीत माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, नानासाहेब महाडिक या गटांच्या भूमिका निर्णायक ठरल्या आहेत. त्यावेळी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांनी शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याचा पवित्रा घेतला आहे. तिन्ही गटांचे नेते महाडिक गटाच्या संपर्कात होते. याबाबत महाडिक गट उद्या, दि. २ आॅक्टोबर रोजी अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहे. जयंत पाटील हे मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर असल्याने वाळवा तालुक्यातील मतदान त्यांना मिळेल, असा दावा त्यांच्या गटाकडून केला जात आहे.
आमदार नाईक गेल्या पाच वर्षात ५१७ कोटींची विकासकामे, वाकुर्डे योजना कार्यान्वित, गिरजवडे प्रकल्प कामास सुरुवात, विविध प्रकल्पांची उभारणी या मुद्यांवर निवडणूक लढवीत आहेत. माजी आमदार शिवाजीराव नाईक वाकुर्डे योजना, विविध प्रकल्पांची उभारणी, पाच वर्षातील खुंटलेला विकास हे विषय घेऊन रिंगणात उतरले आहेत. तसेच सत्यजित देशमुख यांनी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केलेली विकासकामे, पक्षीय कामे, गेल्या पाच वर्षात आणलेला विकास निधी यावर भर दिला आहे.
२००४ मध्ये दोन नाईक गटात फूट पडली, त्यामुळे मानसिंगराव नाईक पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख बंडखोरी करून रिंगणात होते. त्यामध्ये शिवाजीराव नाईक विजयी झाले होते. या निवडणुकीत तिन्ही गट एकमेकांविरुध्द लढले होते. २००९ मध्ये सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्यामध्ये शिवाजीराव नाईक पराभूत झाले होते. आता यावेळी पुन्हा तीन गट एकमेकांसमोर आहेत. तसेच तिन्हीही उमेदवार यावेळी पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत. आमदार नाईक, माजी आमदार नाईक यांनी सहा महिन्यांपासूनच प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर सत्यजित यांनी आघाडी झाली नाही तर आपल्याला उमेदवारी मिळेल या विचारात प्रचार धिम्या गतीने चालू ठेवला होता. आता त्यांनी प्रचारात वेग घेतला आहे. भाजप-शिवसेना वेगळी झाल्याने याचा फटका या युतीच्या उमेदवारांना बसणार आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या उमेदवारांनाही मतविभागणीचा फटका बसेल. तिन्ही उमेदवार गावेच्या गावे, वस्त्या न वस्त्या, वाड्या न वाड्या पिंजून काढत आहेत. कार्यकर्त्यांची पळवापळव, गेलेले कार्यकर्ते परत आणणे यासाठी प्रमुख नेत्यांची दमछाक होत आहे.
शिवसेनेने नंदकिशोर नीलकंठ, बसपने वैभव वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मिळणारी मते निर्णायक ठरतील.
निवडणुकीत या मतदारसंघातील दोन नाईक-देशमुख या तीन गटांची ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘आर या पार’ याप्रमाणे तिन्ही नेते मैदानात आहेत.
शिराळा
एकूण मतदार २,७४,४२७
नावपक्ष
मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी
शिवाजीराव नाईकभाजप
सत्यजित देशमुखकाँग्रेस
नंदकिशोर नीलकंठ शिवसेना
वैभव वाघमारेबसपा
विश्वजित पवारअपक्ष
बबनराव परीटअपक्ष
मोहन ऐतवडेकरअपक्ष
संजय जाधवअपक्ष