कोंजवडे ते माळवाडी घाटात ट्रॅक्टर दरीत कोसळून चालकासह दोघे ठार-ट्रॉलीचाही चक्काचूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 08:57 PM2018-06-07T20:57:11+5:302018-06-07T20:57:11+5:30
पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला.
उंब्रज : पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातात सांगली जिल्'ातील ट्रॅक्टर चालकासह एकजण जागीच ठार झाला. बुधवार, दि. ६ रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात ट्रॅक्टर व ट्रॉलीचा चक्काचूर झाला.
ट्रॅक्टर चालक विलास जायगुंडा कराळे (वय २६), इराप्पा दशरथ खरात (२५ दोघे रा. तिकुंडी करेवाडी, ता. जत, जि. सांगली, सध्या रा. कोर्टी, ता. कºहाड) अशी अपघातात जागीच ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत तारळे दूरक्षेत्राच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्'ातील जत तालुक्यातील तिकुंडी करेवाडी गावातील काही कुटुंबे गेल्या काही वर्षांपासून कोर्टी येथे वास्तव्यास आहेत. ते शेणखत विक्रीचा व्यवसाय करतात. त्या कुटुंबातील सदस्य पाटण तालुक्यातून शेणखत खरेदी करून ते कºहाड तालुक्यातील बागायतदार शेतकºयांना विक्री करतात. नेहमीप्रमाणे ते सर्वजण बुधवारी दोन ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन माळवाडी येथे शेणखत भरण्यासाठी निघाले होते. दरम्यान, ट्रॅक्टर (एमएच १० ए वाय २८०५) मध्ये चालक विकास कराळे व इराप्पा खरात हे दोघे बसले होते. तर दुसºया ट्रॅक्टरमध्ये इतर जण बसले होते.
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सर्वजण दोन ट्रॅक्टरमधून कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतील घाटातील मध्य वळणावर आले. घाटाच्या मध्यावर आल्यानंतर एका धोकादायक वळणावरून जात असताना चालक विलास कराळे यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह दोनशे फूट दरीत खाली कोसळला. यात दोघे जागीच ठार झाले. पुढील ट्रॅक्टर अंधारातून दरीत कोसळण्याचा आवाज झाल्यानंतर पाठीमागून येत असलेल्या ट्रॅक्टरवरील युवकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील भुडकेवाडी (वरची) येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच भुडकेवाडीतील युवकांनी माळवाडी, कडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांना फोनवरून माहिती दिली असता त्या ठिकाणी दोन्ही गावांतील ग्रामस्थ आले.
घटनेची माहिती मिळताच तारळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक एम. के. आवळे, हवालदार पी. एम. मोहिते, वाघ, नलवडे हे घटनास्थळी दाखले झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल दरीत कोसळलेल्या ट्रॅक्टरमधील युवकांचे मृतदेह बाहेर काढले. सुमारे चार तास मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस हवालदार मुरलीधर अवघडे करत आहेत या अपघाताची खबर बापू दशरथ खरात (रा. तिकुंडी, ता. जत) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे.
स्थानिक युवकांकडून मदतकार्य
पहाटेच्या सुमारास युवक, ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी दोन युवकांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. दरम्यान घटनास्थळी खोल दरी असल्याने ट्रॅक्टरचे तुकडे होऊन ते दरीत विखुरले होते. रात्रीच्या अंधारात घाटातील वळणावर निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवल्याबद्दल स्वत:सह एकाच्या मृत्यूस कारणीभूत होऊन ट्रॅक्टर व ट्रॉलीचे सात लाख रुपयांचे नुकसान केल्याबद्दल मयत चालकावर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.