चुकीच्या कारभाराने ऊसतोडणी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:59+5:302021-01-09T04:21:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गेल्या दहा वर्षांत दोन्ही संचालक बोर्डाने ऊसतोडणीकडे लक्षच दिले नाही. आज यांत्रिकी तोडीची काळाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या दहा वर्षांत दोन्ही संचालक बोर्डाने ऊसतोडणीकडे लक्षच दिले नाही. आज यांत्रिकी तोडीची काळाची गरज आहे. एका बोर्डाच्या कारभारामुळे ७०० तोडणीधारक कारखान्याकडे फिरकत नाहीत. कारण त्यांच्या नावावर वित्तीय संस्थेचे बोगस कर्ज लादले आहे. त्यामुळे सभासदांची ऊसतोडणी अडचणीची आली आहे, असा घणाघाती आरोप रयत पॅनलचे प्रमुख, यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सोशल मीडियावरून केला आहे.
गेल्या दहा वर्षांत कृष्णेची विकास योजना अडचणीत आली आहे. ऊसतोडणी कामगारांची कमतरता आणि भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी २००८ मध्ये यांत्रिकी तोडीचे नियोजन केले होते, परंतु याकडे दोन्हीही बोर्डाने दुर्लक्ष केले आहे. शेती विभागाच्या ऊसतोडणीच्या अनुषंगाने रयत पॅनलने तोडीकडे लक्ष दिले होते. त्यानंतर या यांत्रिकी ऊसतोडीकडे निवडून आलेल्या अध्यक्षांनी फारसे लक्ष दिले नाही. ऊसतोडीबाबत सद्य:स्थितीतील अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. मधल्या काळात ऊसतोडणी वाहतुकीच्या कर्जामध्ये काही घोटाळे झाले. त्यामुळे कारखान्याकडे येणारे ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार आपल्याकडे करार करण्यास कर्जाच्या भीतीने घाबरू लागले आहेत. गेल्या दहा वर्षांत शेती विभागावर धाक नसल्याने ऊस नोंद रानात होत नाही.
खोट्या नोंदी केल्या जातात. ऊसतोड राजकीय द्वेष व राजकीय हेतूनेच राबविला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला जणू काही वालीच राहिला नाही. आपल्या कारखान्याच्या तोडणीबाबत अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. कारखान्याला पूर्ण वेळ देणाऱ्या संचालक मंडळाची गरज आहे. यांत्रिक ऊसतोडणीबरोबर लागणीचेही यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. या आधुनिकतेच्या सर्व गोष्टी यशवंतराव मोहिते यांनी सुचविल्या होत्या, परंतु गेल्या १० वर्षांत यातील काहीही झाले नाही, असे आरोप मोहिते यांनी केला. या आरोपामुळे सत्ताधारीसह सहकार आणि संस्थापक पॅनलवर करून सोशल मीडियावर निवडणुकीच्या अगोदरच प्रचाराचा धुरळा उडविला आहे.
फोटो - 08012021- आयएसएलएम -डॉ. इंद्रजित मोहिते