शिस्तीअभावी सहकार अडचणीत

By admin | Published: January 21, 2015 10:46 PM2015-01-21T22:46:15+5:302015-01-21T23:59:54+5:30

पृथ्वीराज चव्हाण : गुलाबराव पाटील पुरस्कार डी. वाय. पाटील यांना प्रदान

Trouble in the face of disciplining | शिस्तीअभावी सहकार अडचणीत

शिस्तीअभावी सहकार अडचणीत

Next

सांगली : देशाच्या नव्या आर्थिक सुधारणांत सहकारी संस्थांचा टिकाव लागलेला नाही. राज्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या या चळवळीतील दोष दूर करून शिस्त लावावी लागेल, अन्यथा ती इतिहासजमा होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवारी) सांगलीत केले. गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने गुलाबराव पाटील यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील भावे नाट्यगृहात आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात चव्हाण बोलत होते. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांना ‘सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कारा’ने तर धोंडीसाहेब देशमुख (दिघंची) यांना ‘ऋणानुबंध पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. कर्नाटक खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी मंत्री आ. पतंगराव कदम, मदन पाटील, आ. आनंदराव पाटील, माजी आमदार संपतराव चव्हाण उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, गुलाबराव पाटील यांनी सांगली जिल्हा बँक व राज्य बँकेचे नेतृत्व केले. त्यांच्या काळात बँकेला शिस्त होती. आज या दोन्ही बँकांच्या घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. राज्य बँकेला अकराशे कोटींचा तोटा झाला होता. आपण मुख्यमंत्रीपदी असताना कठोर पावले उचलत बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. आता चार वर्षांनी राज्य बँक सातशे कोटी नफ्यात आली आहे. देशाने १९९२ मध्ये नव्या आर्थिक सुधारणा लागू केल्या. त्यात सहकारी संस्था टिकाव धरू शकल्या नाहीत. बँका, साखर कारखान्यांचे खासगीकरण वाढले आहे. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा आर्थिक कणा म्हणून सहकारी संस्थांचा नामोल्लेख होतो. विदर्भात अजून ही चळवळ वाढलेली नाही. या चळवळीतील दोष दूर करावे लागतील, तरच ही चळवळ भविष्यात टिकेल, अन्यथा इतिहासजमा होईल, असे ते म्हणाले.
सत्कारमूर्ती डी. वाय. पाटील म्हणाले की, बाह्य व अंतर्मनात तीव्र इच्छा असेल तर, सर्वच गोष्टी शक्य होतात. पृथ्वीराज चव्हाण यांची इच्छा तीव्र असली पाहिजे, त्यामुळेच ते मुख्यमंत्री झाले.यावेळी पाटील यांनी राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील स्वत:चा जीवनपट उलगडला. राजारामबापूंनी आपणाला राजकारणात आणले आणि शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. खुजगाव, काळम्मावाडीचा प्रश्न सोडविला. वसंतदादांनी एकाचवेळी ५२ महाविद्यालयांना मंजुरी दिली. राज्याच्या शैक्षणिक क्रांतीचे श्रेय वसंतदादांनाच आहे, असेही ते म्हणाले. पतंगराव कदम म्हणाले की, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य व जिल्हा बँक देशात पहिल्या क्रमांकावर होती. आज सहकार, शिक्षण क्षेत्राचे काम दिशाहीन झाले आहे.ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, दीपक शिंदे-म्हैसाळकर, संजय डी. पाटील, बापूसाहेब पुजारी, शहाजीराव जगदाळे, स्थायी समिती सभापती संजय मेंढे, गटनेते किशोर जामदार, प्रमिलादेवी पाटील, एस. बी. तावदारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
के. पी. शहा तमिळनाडूचे राज्यपाल असताना एकदा मी त्यांना भेटण्यासाठी चेन्नईला गेलो होतो. तेथील चपाती मला आवडली. पाच-सहा चपात्या खाल्ल्या. तेव्हा मनात आले की, तशी चपाती खाण्यासाठी आपणही गव्हर्नर होऊ. तेव्हापासून ध्यास घेतला. श्रीमती सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मला राज्यपाल केले, असे डी. वाय. पाटील यांनी सांगताच हशा पिकला.
कोण काय म्हणाले...
पृथ्वीराज चव्हाण अपघाताने नव्हे तीव्र इच्छाशक्तीने मुख्यमंत्री झाले - डी. वाय. पाटील
शिक्षण, सहकार क्षेत्राचे काम दिशाहीन झाले - पतंगराव कदम
सहकार चळवळीतील दोष दूर करणे गरजेचे - पृथ्वीराज चव्हाण
कठोर पावले उचलल्यामुळेच राज्य बॅँक चार वर्षानंतर फायद्यात - पृथ्वीराज चव्हाण


आ. पतंगराव कदम यांना मी नेहमीच आशीर्वाद देत असतो. ते माझे कनिष्ठ बंधू आहेत. त्यांच्या नावाची इतिहास-भूगोलामध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना सांगू इच्छितो की, पुढीलवेळी पतंगरावांना मुख्यमंत्री करा, असे डी. वाय. पाटील यांनी सांगताच सभागृहात टाळ्या पडल्या.
केंद्रातील मनमोहनसिंग सरकार व राज्यातील पृथ्वीराज चव्हाण सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. पण ते जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. मनमोहनसिंगांना भूलभुलय्या दाखवण्याची सवय नव्हती. आता सत्तेवर आलेली मंडळी जनतेला भुलवत आहेत. काँग्रेसचे निर्णय जाहीर करीत आहेत, असा टोला पतंगराव कदम यांनी लगावला.

Web Title: Trouble in the face of disciplining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.