मार्चच्या महासभेलाही गटबाजीचे विघ्न
By Admin | Published: March 11, 2017 11:17 PM2017-03-11T23:17:03+5:302017-03-11T23:17:03+5:30
महापालिकेत अजब राजकारण : वर्षात महापौरांचा पाच मासिक सभांना ‘ब्रेक
’सांगली : सत्ताधारी गटात पडलेली उभी फूट आता महापालिकेच्या कामकाजावर विपरित परिणाम करीत आहे. गेल्या वर्षभरात महापौर हारुण शिकलगार यांनी पाच महासभांना ‘ब्रेक’ लावला असताना पुन्हा गटबाजीच्याच धसक्याने मार्चमध्येही सभा बोलावली नाही.
महापालिकेतील सत्ताधारी कॉँग्रेसमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील एकसंध असणारा गट आता त्यांच्या पश्चात विस्कळीत झाला आहे. नगरसेवक शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर गटाने मदन पाटील गटाची गोची केली आहे. गेल्या वर्षभरात या गटाने अनेकांना आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळेच महापौर हारुण शिकलगार यांनी सध्या सावध राजकीय पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महासभेतील संघर्ष आणि कुरघोड्या अंगलट येऊ नयेत म्हणून शिकलगार यांनी महासभाच न घेण्याचे नवे धोरण स्वीकारले आहे. त्यांच्या या धोरणाचा फटका दैनंदिन कामाला बसत आहे. मार्च महिन्यातही त्यांनी महासभा न घेण्याचे धोरण स्वीकारल्याचे चित्र आहे.
उपमहापौर गटाने राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्य साथीने स्थायी समिती निवडणुकीत झटका दिला. बहुमत असूनही काँग्रेसच्या अणि मदन पाटील गटाच्या फुटीने स्थायी सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सौ. संगीता हारगे यांनी बाजी मारली. त्यामुळे तर आता शिकलगार अल्पमतात आले आहेत. यातूनच त्यांनी गेल्या तेरा महिन्यात केवळ सात वार्षिक सभा घेतल्या. (प्रतिनिधी)
महत्त्वाच्या सभेलाच खंड
अर्थसंकल्पाला अंतिम स्वरुप देण्याचा हा काळ आहे. त्यामुळे मार्चमधील महासभा ही महत्त्वाची ठरते. अर्थसंकल्पातील तरतुदींवर अभ्यास करून सदस्यांना मते मांडता येतात. त्याचबरोबर काही सूचना देऊन नव्या तरतुदी करता येतात. मार्चची महासभा झाली नाही, तर प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार पावले टाकून नंतर अंतिम अंदाजपत्रक तयार करावे लागेल.