इस्लामपुरात फाळकूटदादांचा उच्छाद धाबे, हॉटेल व्यावसायिक, व्यापाºयांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:04 AM2018-02-08T01:04:23+5:302018-02-08T01:04:58+5:30
अशोक पाटील ।
इस्लामपूर : शहर आणि परिसरातील धाबे, हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी यांना दम देणाºया फुकटचंबू फाळकूटदादांनी उच्छाद मांडला आहे. त्यांना पांढरपेशा गुंडांचा आधार मिळत आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
शहरात मोठ्या गुन्ह्यांचा आलेख कमी होत चालला असला तरी, चौका-चौकात फाळकूटदादांची टोळकी वाढू लागली आहेत. हे फाळकूटदादा हॉटेल, ढाबा मालक आणि छोट्या व्यापाºयांना दमदाटी करून पैशांची मागणी करत आहेत; तर काहीजण मोबाईल दुकानदारांना दम देऊन मोबाईल उचलून नेतात. तसेच पैसे न देता बॅलन्स मारुन घेतात. याला एखाद्याने नकार दिल्यास मग मारहाण केली जाते. अशा गुंडांवर वचक ठेवण्यासाठी एका मोबाईल दुकानदाराने आपल्याकडेच दोन गुंड ठेवले आहेत. या सर्व प्रकाराबाबात पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे या दादांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
वाहतुकीची समस्या नेहमीचीच डोकेदुखी आहे. गुरुवारी आणि रविवारी आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. याचा फायदा चोरटे उचलतात. बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरीचे प्रमाणही वाढतच चालले आहे. या बाजारातही फाळकूटदादा हप्ते वसूल करताना दिसतात. बाहेरील छोट्या व्यापाºयांकडूनही पावतीपेक्षा जादा पैसे वसूल केले जातात.
बसस्थानकावरील चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, पर्स मारणे आदी घटना घडू लागल्या आहेत. यामध्ये या फाळकूटदादांचाच वरदहस्त आहे. येथे नेमणुकीसाठी असलेले पोलीस मात्र नेहमीच इतरत्र भटकताना दिसतात.
फाळकूटदादा : ‘स्पेशल मसुरा’
इस्लामपूर परिसरातील धाब्यांवर ‘अख्खा मसूर’ ही डीश लोकप्रिय आहे. अनेक फाळकूटदादा फुकट अख्खा मसूर खाण्यासाठी चटावलेले आहेत. त्यामुळे एका ढाब्यावर चांगलीच शक्कल लढवली आहे. फाळकूटदादांची गँग आली की त्यांना इतरांपेक्षा ‘स्पेशल’ मसुरा दिला जातो. हा स्पेशल मसुरा म्हणजे इतर ग्राहकांच्या ताटातील उष्टा मसुरा असतो. ताटात शिल्लक राहिलेला हा मसुरा गोळा करून त्यांना दिला जातो. त्यावर हे दादा ताव मारताना दिसतात!